BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२२

चोरट्या महिलांनी रिक्षातून पळवले बारा लाखांचे दागिने !

 




सोलापूर : पती पत्नी रिक्षातून आपल्या मुलीच्या घरी निघाले असताना महिलेच्या बॅगेतून तब्बल साडे अकरा लाखांचे सोने चोर महिलांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर शहरात घडला आहे. (Solapur Crime)  


अलीकडे चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे परंतु सोलापुरात काही महिलांनी साडे अकरा लाखांचे सोने एवढ्या हातचलाखीने पळवले की सोन्याची चोरी झाल्याचे घरी गेल्यावर लक्षात आले आणि त्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली, दरम्यान चोरट्या महिला कुठल्या कुठे गायब देखील झालेल्या होत्या.  उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर येथील साठ वर्षे वयाच्या अलका भगवानराव जोशी, त्यांचे पती भगवानराव जोशी हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी आपल्या नातूसह उस्मानाबाद येथून सोलापूरला आले होते. उस्मानाबाद येथून ते सोलापूरला राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून आले आणि सोलापूर बस स्थानकावर उतरले. 


सोलापूर बस स्थानकावरून त्यांना वामननगर, जुळे सोलापूर येथे मुलीच्या जायचे होते त्यामुळे तिघेही एका रिक्षात बसले आणि मुलीच्या घराकडे निघाले.  रिक्षा काही अंतरावर गेल्यावर तीन महिलाही याच रिक्षात बसल्या. रिक्षात गर्दी झाली होती त्यामुळे दोन महिला मागे तर एक महिला रिक्षा चालकाच्या बाजूला बसली. अलका जोशी यांनी आपली कपड्यांची बॅग पतीच्या मांडीवर ठेवली होती. या बॅगेतील पर्समध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले होते.  रिक्षात प्रवाशांची गर्दी झाल्याने चुळबुळ सुरु होती. दाटीवाटीने सगळे बसलेले असल्याने एकमेकांना धक्के लागत होते. यातील एक महिला जोशी यांच्या बॅगेला देखील हात लावताना दिसत होती.  या तीन  महिला सात रस्ता येथे उतरल्या आणि निघून गेल्या. त्यानंतर रिक्षा पुढे निघून गेली.  अलका जोशी, त्यांचे पती आणि नातू हे तिघेही आपल्या मुलीच्या  घरी जुळे सोलापूर येथे पोहोचले. (Jewelry theft) 


रिक्षातून उतरून मुलीच्या घरी गेल्यावर अलका जोशी यांनी कपड्याच्या बॅगेतील आपली पर्स तपासली असता ती सापडत नव्हती. आपली सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सदर बाजार पोलिसात धाव घेतली. सदर पर्स मध्ये साडे अकरा लाखांचे दागिने होते. एवढे मोठे दागिने हातोहात आणि हातचलाखी करीत लंपास करण्यात आले होते. या चोरीच्या प्रकाराने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. या चोरीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही तपासून चोरीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. 


या घटनेत जोशी यांचे ११ लाख ४४ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे, यात दोन लाख रुपयांच्या सोन्याचा पाटल्या, २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ४ पाटल्या, १ लाख ८० हजार रुपये किमतीचे गंठण, १ लाख ८० हजार रुपये किमतीचा राणीहार, दोन तोळे सोन्याचे लॉकेट, नेकलेस, चैन, अंगठ्या, कर्णफुले, सोन्याची लगड अशा दागिन्यांसह पॅन कार्ड, आधार कार्ड, तीन एटीएम कार्ड देखील चोरीला गेले आहे. (Gold stolen from a rickshaw ) या घटनेने मोठी खळबळ उडाली असून जेष्ठ व्यक्तीची सुरक्षा धोक्यात आली आहे. दागिने घरात ठेवून बाहेर गेले तरी घरात चोरी होते आणि सोबत बाळगले तरी अशा प्रकारे हातोहात चोरी होते त्यामुळे किमती दागिने वापरणे हे देखील आता जोखमीचे होऊ लागले आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !