BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२२

अजित पवारांच्या नावाने दहा लाखाचा गंडा !

 



पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचा वापर करून आणखी एकाने दहा लाखाचा गंडा घालण्याचा प्रकार केला असल्याचे उघडकीस आहे आहे. 


आपली मंत्रालयात ओळख आहे असे सांगून गरजू व्यक्तीची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत पण अलीकडेच अजितदादा पवार यांच्या फोन क्रमांकाचा वापर करून जमीन व्यवहारात एकाची फसवणूक केली असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता आणि या भामट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. या घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली होतीच पण आता असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला असून याबाबत पोलिसात तक्रार देखील दाखल झाली आहे. (Pune Crime) या प्रकरणी दोघांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्याच्या वारजे भागात राहणाऱ्या महेश पटवर्धन यांची दोघांनी मिळून दहा लाखांची फसवणूक केली आहे. सातारा तालुक्यातील वाई येथे राहणारा प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने आपली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीए सोबत ओळख असल्याची बतावणी केली आणि फसवणूक केली. पुणे महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या विकास कामातील काम आपल्याला मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. अशीच इच्छा पटवर्धन यांची देखील होती. याचाच फायदा या दोन भामट्यानी उठवला.  महापालिकेच्या विकास कामातील ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो म्हणून त्यांनी ही टोपी घातली. 


आपली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी परिचय आहे, तुमचे काम त्यांच्याकडून होऊन जाईल अशी बतावणी प्रवीण जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने केली. त्यांच्या या भूलथापांना महेश पटवर्धन बळी पडले आणि जगताप याला दहा लाख रुपये या कामासाठी दिले. थेट अजितदादा पवार यांच्या पीएशीच परिचय असल्याने हे काम सहज होऊन जाईल अशी पटवर्धन याना खात्री होती परंतु त्यांचे काम होताना दिसत नव्हते. (Fraud in the name of Ajit Pawar) अखेर हे काम होत नसल्याचे पाहून त्यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि पटवर्धन यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रवीण जगताप आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून जगताप याला अटक करण्यात आली आहे.        


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !