इंदूर : पंढरीच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त असणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे बडे नेते राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह ( Digvijaya Singh) यांना इंदूर विशेष न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
उजैन येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या (Bharatiy Janata Yuva Morcha) आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी २०११ मध्ये झालेल्या संघर्षात इंदूर विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह सहा जणांना प्रत्येकी एक वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या सर्व आरोपींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड देखील केला आहे. दिग्विजय सिंह यांचा ताफा १७ जुलै २०११ रोजी उजैन येथील जिवाजीगंज परिसरातून निघाला होता यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वादग्रस्त वक्तव्याबाबत दिग्विजय सिंह यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. यावेळी दिग्विजय सिंह आणि माजी खासदार प्रेमचंद गुड्डू तसेच त्यांचे सहकारी यांची आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची झटापट झाली होती.
या प्रकरणी दिग्विजय सिंह आणि प्रेमचंद गुड्डू यांना जाणीवपूर्वक दुखापत करणे आणि हल्ला करण्यास प्रवृत्त करणे या भारतीय दंड विधान कलम ३२५ आणि १०९ अन्वये विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. त्यांचे सहकारी अनंत नारायण, जयसिंह दरबार, अस्लम लाला, दिलीप चौधरी यांना देखील भारतीय दंड विधान कलम ३२५ अन्वये दोषी धरण्यात आले आहे. त्यानुसार या सर्वाना एक वर्षे सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Former Chief Minister Digvijay Singh sentenced to one year) या निकालाने मध्य प्रदेश राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या खटल्यातून काँग्रेस आमदार महेश परमार, मुकेश भाती, हेमंत चौहान यांना मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
शिक्षेला स्थगिती
सदर प्रकरणात एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावल्यानंतर विशेष न्यायालयाने लगेच या शिक्षेच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह आणि अन्य सहकारी या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. घटनेच्या मूळ एफआयआर मध्ये आपले नाव आरोपी म्हणून नव्हते परंतु नंतर राजकीय दबावातून पोलिसांनी आपले नाव आरोपींच्या यादीत घुसवले असल्याचे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
विठ्ठलभक्त दिग्विजय सिंह !
वादग्रस्त वक्तव्य करण्यामुळे सतत वादात आणि चर्चेत असलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे निस्सीम विठ्ठलभक्त असून दरवर्षी ते आषाढी एकादशीला पंढरपूर येथे असतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत ते शासकीय महापुजेला उपस्थित असतात. मुख्यमंत्री पदावर असताना आणि नसतानाही ते पंढरीची आषाढी वारी चुकवत नाहीत. मुख्यमंत्री असले तरी ते पंढरीत आल्यानंतर अत्यंत साधेपणाने राहतात. काँग्रेस पक्षातील ते बडे नेते असून पक्षात त्यांना कायम मोठे स्थान मिळाले आहे.
हे देखील वाचा :
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !