BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ फेब्रु, २०२२

पंढरीच्या वारकऱ्यांचा खून, पोलिसास जन्मठेपेची शिक्षा !

 



श्रीगोंदा : पंढरपूरच्या वारीला आलेल्या सांगोला तालुक्यातील भाविकाचा खून केल्याप्रकरणी मंगळवेढा येथील पोलीस नाईक दत्तात्रय भोसले याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 


मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या दत्तात्रय भोसले याने सांगोला तालुक्यातील नितीन यादव या भाविकाचा अत्यंत कौशल्याने खून करून पुरावा नष्ट केला होता परंतु मोबाईल लोकेशनच्या आधाराने संशयाची सुई मंगळवेढा इथपर्यंत पोहोचली आणि पोलीस नाईक दत्तात्रय भोसले याला या खून पराकारणात अटक काण्यात आली होती. अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दत्तात्रय भोसले याला दोषी धरून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कर्जत तालुक्यातील  बाभूळगाव (खालसा) येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात एक मृतदेह असल्याचे तेथील पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळवले होते त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.  


मयत नितीन यादव हा पंढरपूरच्या वारीसाठी पंढरपूर येथे गेला होता. यावेळी मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दत्तात्रय भोसले हा वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे होता.  भोसले आणि नितीन यांची पंढरपूर येथे भेट झाली होती. मठात तसेच बाहेर हॉटेलमध्येही दोघे भेटलेले होते. ५ जुलै २०१७ रोजी नितीन आपल्या दिंडीतून परत गावी निघाला असता भोसले याने नितीनला थांबवले. आपण बाहेर जेवायला जाऊ असे सांगून त्याने थांबवून ठेवले होते. ही बाब नितीन याने दोघांना संगीतलीही होती. त्यानंतर नितीन घेरडी येथे पोहोचला परंतु तो घरी गेला नाही. पंढरपूर वारीला गेलेला नितीन घरी न आल्याने घराच्या मंडळीनी त्याचा शोध घेतला पण तो कुठेच आढळून आला नाही म्हणून सांगोला पोलीस ठाण्यात ६ जुलै रोजी तक्रार देण्यात आली होती. 


नितीनचा कुठेच पत्ता लागत नाही हे पाहून नितीनचा भाऊ प्रदीप यादव याने दत्तात्रय भोसले या पोलिसांकडे चौकशी केली. नितीनचा मृतदेह कर्जत पोलिसांना मिळाला असल्याचे सांगून भोसले याने प्रदीपला फोटो देखील पाठवून दिले. पंढरपूरच्या वारीला गेलेला आणि परत गावापर्यंत आलेला नितीन कर्जतकडे कसा गेला हे न उलगडणारे कोडे होते. नितीनचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट होते आणि कर्जत पोलिसांना रस्त्याकडेला सापडलेला मृतदेह नितीन यादव याचाच होता. कर्जत पोलिसांनी तपास सुरु केला होता. नितीन याचा मोबाईल कुठेच मिळाला नव्हता त्यामुळे तपासात या मोबाईलचा शोध सुरु झाला. 


सदर मोबाईलचे लोकेशन मंगळवेढा येथे दाखविले जात होते त्यामुळे पोलीस नाईक दत्तात्रय भोसले याच्यावर संशय बळावला होता. कर्जत पोलिसांनी मंगळवेढा येथे दत्तात्रय भोसले याच्या घराची झडती घेतली असता नितीनचा मोबाईल त्याच्या घरात मिळून आला होता. दत्तात्रय भोसले याने आपल्या कपाटातून तो मोबाईल काढून दिला होता आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील त्याने पोलिसांना दिली शिवाय तपासात त्याने गुन्ह्याची कबुली देत मृतदेह टाकल्याची जागा देखील सांगितली. त्याच्यासोबत सहभाग असल्याच्या आरोपावरून राजेंद्र पाटील यालाही अटक करण्यात आली होती. पाटील यास पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले परंतु भोसले याला मात्र शिक्षा सुनावण्यात आली आहे. नगर जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला चालला आणि पोलीस नाईक दत्तात्रय भोसले यास दोषी धरून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !