सोलापूर : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असला तरी सोलापूर विभागातील दोनशे बस रस्त्यावर धावत असल्याची माहिती एस. टी. विभागाकडून देण्यात आली.
राज्य परिवहन कर्मचारी संप अधिकच ताणला गेला असून प्रवाशांचे हाल तर होताच आहेत पण परिवहन कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब देखील आर्थिक संकटात सापडले आहे. राज्य शासनाने भरघोस वेतनवाढ मान्य करूनही संप संपला नाही. राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप अडला असून विलीनीकरण ही काही सामान्य प्रक्रिया नाही त्यामुळे संप मिटणे लांबट गेले असून अनेक कर्मचारी निलंबित झाले आहेत तर अनेकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. आर्थिक अडचण तसेच कारवाईची भीती यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कमी प्रमाणात का होईना पण एस. टी. रस्त्यावर धावताना दिसत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून संप सुरु असला तरी सोलापूर विभागातील एस.टी. ची वाहतूक काही प्रमाणात का होईना पण सुरु झाली आहे. सोलापूर विभागातील ९ आगारातून एस. टी. सेवा सुरु आहे. सोलापूर विभागातील एकूण ६०० एस. टी. बस पैकी २०० बस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत आणि येत्या काही दिवसांत आणखी बस आगारातून बाहेर पडतील असा विश्वास राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. परिवहन कर्मचारी अडून बसलेले असून ते अद्याप संपावर ठाम आहेत तर परिवहन महामंडळाकडून सोलापूर आगारात वीस खाजगी चालकांची नियुक्ती करून एस टी चा वेग वाढविण्यात आला आहे. कामावर परतलेले काही कर्मचारी आणि खाजगी चालकांची नियुक्ती यामुळे काही प्रमाणात का होईना पण राज्य परिवहन महामंडळाच्या बस रस्त्यावर दिसू लागल्या आहेत आणि सामान्य प्रवाशांना अंशत: का होईना पण दिलासा मिळाला आहे.
राज्य परिवहन प्रशासन आपल्या पातळीवरून बस सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना कर्मचारी मात्र संपावर ठाम असल्याचे दिसत आहेत. पहिल्यांदाच एवढा प्रदीर्घ काळ हा संप सुरु आहे त्यामुळे सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी मात्र या काळात हात धुवून घेतले असून खाजगी वाहनाशिवाय प्रवासाला पर्याय उरला नाही. परिवहन कर्मचारी देखील आर्थिक कोंडीत अडकले असून या संपामुळे ६१ कर्मचाऱ्यांनी आपला प्राण गमावला आहे. अनेक संकटे समोर उभी राहत असली तरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !