शोध न्यूज : चोर घरात घुसला की तो काही न काही चोरी करून जाणार हे उघड आहे, पण एक चोर घरात घुसला आणि चक्क घरमालकालाच पैसे देऊन गेल्याची धम्माल घटना घडली आहे.
दरवाजाला कुलूप दिसले की चोरांना चोरी करण्याचे आयते निमंत्रणच मिळत असते. रात्रीच्या वेळेस आणि दिवसही संधी साधून चोर घरात घुसून चोर डल्ला मारतातच ! पण अलीकडे काही चोर वेगळ्याच करामती करतात हे देखील दिसून येत आहे. चोरी करून जातात पण एक चिट्ठी ठेवून जातात, गरज होती म्हणून चोरी करून जात आहे, आपली रक्कम परत केली जाईल असा संदेश ठेवून चोर चोरी करून गेल्याचीही काही उदाहरणे घडली आहेत. वॉशिंग्टन येथे मात्र चोराने एक वेगळेच रूप दाखवले आहे. रात्रीच्या वेळी घरात तर घुसला पण चोरी करून पळून जाण्याऐवजी त्या घरातच त्याने झोप काढली आणि सकाळी जाताना मालकाला काही पैसे देखील देऊन गेला.
न्यू मेक्सिको येथे एका घरात खिडकीतून सशस्त्र चोर घुसला. घरात आल्यावर दागिने, रोकड शोधण्याऐवजी चोराने प्रथम बाथरूममध्ये जाऊन अंघोळ केली. शांतपणे अंघोळ केल्यावर त्याने खाण्याच्या वस्तूंचा शोध घेतला. त्याच घरात अगदी घरातल्या माणसाप्रमाणे त्याने जेवण केले आणि बेडवर जाऊन पहुडला. शांतपणे आणि निवांतपणे त्याने त्याच घरात एक झोप काढली. झोप झाल्यावर परत जाण्याच्या वेळेस त्याने घरमालकाला बोलावून तब्बल २०० डॉलर म्हणजे पंधरा हजार रुपयांची रक्कम देखील दिली. हा सगळा प्रकार पाहून घरमालक आचंबित झाला होता. खिडकीतून आलेला चोर घरात खातो पितो, झोप काढतो आणि जाताना रक्कम देतो हा सगळा प्रकार अजब वाटत होता. या चोराने घरमालकाची क्षमा देखील मागितली आणि आपली कहाणी सांगितली. झोपण्यासाठी उबदार जागा हवी होती म्हणून आपण येथे आलो. खिडकी तोडल्याबद्धल माफी मागत त्याने खिडकीच्या खर्चापोटी पंधरा हजार रुपये दिले होते.
पूर्व टेक्सस येथे आपल्या कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे. आपलीही हत्या होईल म्हणून त्यांच्यापासून आपण लपून छपून राहात असल्याचे देखील त्याने सांगितले. अचानक जवळच आपली कार खराब झाली त्यामुळे या घरात घुसावे लागले असेही सांगून तो तेथून निघून गेला. दुसऱ्याच दिवशी एक कार चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. चोराने बळजबरीने कार मालकाची कार पळवून नेली होती. त्याचे वर्णन आणि घरात घुसलेल्या चोरांचे वर्णन मिळतेजुळते होते. अखेर रस्त्यावरून जात असलेल्या याच चोराला पोलिसांनी पकडले आणि तुरुंगात डांबले !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !