BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ फेब्रु, २०२२

पोलीस अधिकारीच बेपत्ता, पोलीस घेताहेत शोध !





जालना : जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस आता या अधिकाऱ्याचा शोध घेत आहेत. 


एखादी व्यक्ती हरवली अथवा बेपत्ता झाली तर सामान्य माणूस पोलिसांची मदत घेतो पण जालना येथे वेगळीच घटना समोर आली आहे. पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी संग्राम ताटे हे अचानक बेपत्ता असल्याचे दिसून आले आहे. २ जानेवारीच्या सायंकाळपासून हे अधिकारी गायब झालेले असून या घटनेने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एक पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता कसा होऊ शकतो याचेच कोडे पोलिसांच्या समोर देखील आहे. पोलीस अधिकारी संग्राम ताटे यांच्या पत्नीनेच याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ते हरवले असल्याची नोंद केली आहे.  


ताटे यांच्या पत्नीने देलेल्या माहितीनुसार संग्राम ताटे हे २ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटायला जातो म्हणून घरातून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी मोबाईल, गाडी हे सोबत काहीच नेले नाही. मित्राला भेटायला जातो म्हणून ते यशवंतनगर येथील घरातून बाहेर पडले ते परतलेच नाहीत. अशा प्रकारे अचानक त्यांच्या बेपत्ता होण्याने रहस्य वाढले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस अधिकारी असूनही त्यांनी बाहेर जाताना गाडी आणि मोबाईल कसा नेला नाही ? हा प्रश्न कोड्यात टाकणारा आणि काही प्रश्न निर्माण करणारा आहे.  


औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांनीही संग्राम ताटे यांची जालना शहरात दिवसभर शोधाशोध केली परंतु त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्याच्या अशा बेपत्ता होण्याने पोलीस दलात, विशेषत: लाचलुचपत प्रतिबंधक विभागात खळबळ उडाली असून चिंताही व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे बेपत्ता संग्राम ताटे यांना बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली असून त्यांची बढतीवर कोकण विभागात बदली झाली आहे. अशा वेळी त्यांचे बेपत्ता होणे हे सगळ्यांचा कोड्यात टाकणारे आणि चिंता वाढविणारे ठरले आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !