मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळयाप्रकरणी राज्यातील हजारो बोगस शिक्षकावर कारवाई होण्याचे संकेत मिळत असून अशा शिक्षकांची यादी देखील तयार करण्यात आली आहे.
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील मोठा घोटाळा समोर आला असून यात अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या हातात बेड्या पडलेल्या आहेत. एकूण भरती प्रक्रियाच वादात सापडली असून पैसे देऊन शिक्षक झालेल्याची यादी पुणे पोलिसांनी तयार केली आहे. त्यामुळे बोगस असलेल्या ७ हजार ८०० शिक्षकावर कारवाईची टांगती तलवार आहे. शिक्षण परिषदेच्या आयुक्तांपासून अनेक जणांचा या घोटाळ्यात सहभाग आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरु करण्यात आलेली आहेच पण आता या प्रकरणात सहभागी असलेले बोगस शिक्षक देखील अडकणार आहेत. पैसे देऊन हजारो जण शिक्षक बनले आहेत पण हे आता त्यांना भलतेच महागात पडू लागले आहे.
अपात्र असतानाही ७ हजार ८०० उमेदवारांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हा प्रकार तपासात उघडकीस आला असून तसे निष्पन्न देखील झाले आहे. त्यानुसार ७ हजार ८०० बोगस शिक्षकांची यादी पुणे पोलिसांनी तयार केली आहे. त्याची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून २०१९ - २० च्या शिक्षक पात्रता परीक्षेतील हा गैरप्रकार आहे. १६ हजार ७०५ पात्र उमेदवारांच्या कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपी यांच्याकडून मिळालेल्या डिजिटल पुराव्याचा एकत्रित तपास करण्यात आला आहे.
एकंदर तपास करून ७ हजार ८८० अपात्र असलेल्या उमेदवारांना पात्र करण्यासाठी मूळ गुणात वाढ करण्यात आली आणि त्यांना पात्र करण्यात आल्याचे तपासात आढळून आलेले आहे. सद्या जरी एवढा आकडा असला तरी यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील हा महाघोटाळा असून अनेक बडे मासे देखील या जाळ्यात अडकले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !