मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पाडण्यासाठी आपणास ऑफर आणि धमकीही आली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याचे राजकीय खळबळ उडाली आहे. राऊत यांनी उपराष्ट्रपती यांना तसे पत्रच दिले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भाजप प्रचंड अस्वस्थ असल्याचे चित्र रोज दिसत आहे. सरकार पडण्याची भाषा करीत अनेक नेत्यांनी दिलेल्या मुदती संपून गेल्या पण सरकार काही पडले नाही. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. कधी नव्हे एवढा या यंत्रणेचा वावर गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात वाढला आहे. केंद्रीय सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने महाविकास आघाडीकडून झाल्या आहेत. आता मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाच पत्र लिहून धक्कादायक माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपल्याला ऑफर आणि धमकी आली आहे. राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यात मदत करणे नाकारल्यास तुरुंगात डांबण्याची धमकीही देण्यात आली आहे. सरकार पाडण्यासाठी मी महत्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून सरकार पडून मध्यावधी निवडणूक घेतली जाईल. आपण याला नकार दिलेला असल्याने या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी देखील धमकी आपणास देण्यात आली आहे असे खा. संजय राऊत यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे. माझ्यासह दोनकॅबिनेट मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांना देखील तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
सरकार पाडण्यासाठी देण्यात आलेली ऑफर नाकारण्यामुळे ईडी मार्फत आपल्या कुटुंबीयांची आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे, ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले असल्याचेही संजय राऊत यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे. या तपास यंत्रणांनी आत्तापर्यंत २८ जणांना बेकायदीशीररित्या ताब्यात घेतले असून त्यांनाही अनुकूल जबाब देण्यासाठी धमकावले जात आहे. तपास यंत्रणांना अनुकूल जबाब द्यावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्यांना देण्यात आली असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, नेते आणि त्यांचे नातेवाईक तसेच निकटवर्तिय याना धमकावले जात असून त्यांचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रात सरकार पाडण्याबाबत ऑफर आणि धमकी यांचा उल्लेख केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवाय ते दोन कॅबिनेट मंत्री आणि नेते कोण ? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. सत्तेचा सारीपाट आता वेगळ्याच दिशेने जात असल्याचे संजय राऊत यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे दिसू लागले आहे. येत्या काही राज्याच्या राजकारणात काळात बरीच उलथापालथ होणार असल्याचे हे संकेत मिळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !