कोल्हापूर : भाजपचे आमदार नितेश राणे यांची प्रकृती अधिकच बिघडली असून त्यांना चालताही येणे अशक्य झाले आहे.
शिवसैनिकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांचे नाव आल्यापासून ते राज्यभर चर्चेत आले आहेत. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली पण त्यांना जामीन मिळालाच नाही. आमदार नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत गेला आणि आता त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने आणि सिंधुदुर्ग येथे हृदयरोग तज्ञ नसल्याचे त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच मध्यरात्री पासून त्यांच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. रात्रीत तीन वेळा त्यांच्या उलट्या झाल्या आहेत. याचे कारण समजू शकले नसले तरी अशक्तपणा आल्याने उलट्या झाल्या असाव्यात अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे. त्यांच्या काही तपासण्या कालच करायच्या होत्या पण त्या करण्यात आलेल्या नाहीत. आज त्या तपासण्या करण्यात येणार होत्या परंतु रात्रीपासून त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. यामुळे त्यांच्या आज होणाऱ्या वैद्यकीय तपासण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
नितेश राणे यांना रक्तदाब, छातीत दुखणे याबरोबर मानेच्या दुखण्याचाही त्रास असल्याचे सांगितले जात आहे. जवळपास आठवड्यापासून नितेश राणे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांना अशक्तपणा आलेला आहे. कोल्हापूर येथे जाण्यासाठी ते रुग्णालयातून बाहेर पडत होते त्यावेळी त्यांना व्यवस्थित चालताही येत नसल्याचे दिसत होते. कोल्हापूर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून डॉक्टरने एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !