BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑग, २०२२

'चकवा' देत आयकर अधिकाऱ्यांनी टाकली धाड !

 



शोध न्यूज : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि डीवीपी समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या विविध ठिकाणावर सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे परंतु हे अधिकारी चकवा देत आल्याचे समोर आले आहे. 


आयकर विभागाच्या धाडी या अचानक आणि कुणालाही, कसलाही सुगावा न लागता टाकल्या जातात. संबंधितांची जेथे जेथे मालमत्ता असेल अशा सगळ्याच ठिकाणी एकाच वेळी या धाडी पडत असतात. आपला कसलाच सुगावा लागणार नाही याची पुरेपूर दक्षता या विभागाकडून घेतला जातो आणि त्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या युक्त्या शोधत असतात आणि त्याची अंमलबजावणी देखील करीत असतात. अशा प्रकारे वेगळीच दिशा दाखविल्यामुळे कुणाला शंका येत नाही आणि संबंधित व्यक्तीला धाड पडेपर्यंत कसलाही सुगावा लागत नाही. 


काही दिवसांपूर्वीच जालना येथे कापड आणि रियल इस्टेट व्यापाऱ्यांवर मोठ्या धाडी टाकताना देखील आयकर विभागाने अशीच युक्ती केली होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनेक गाड्या जालन्यात दाखल झाल्या होत्या पण या प्रत्येक गाडीवर एका लग्नाचे स्टीकर लावलेले होते. 'राहुल वेड्स अंजली' असे स्टीकर लावलेल्या या गाड्या जालना येथे आल्या तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. लग्नाच्या तारखा तर नाहीत पण तरीही एकदम एवढ्या गाड्या कुठल्या लग्नासाठी आल्या ?  असा प्रश्न जालनावासियांना पडला होता. नसलेल्या लग्नाचे स्टीकर लावून, वऱ्हाडी बनून आयकर अधिकारी आले आणि मोठ्या यशस्वी धाडी टाकण्यात आल्या. 


पंढरपूर येथील डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या घर, कार्यालयावर आज सकाळपासून छापेमारी सुरु केली आहे तसेच त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील 'धाराशिव साखर कारखान्यावर' देखील आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि तपासणी सुरु केली आहे. सकाळपासून ही कारवाई सुरु करण्यात आली असून ती अद्याप सुरूच आहे. आणखी काही
 दिवस ही कारवाई सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


धाराशिव साखर कारखान्यावर छापा टाकण्यासाठी आलेल्या आयकर अधिकाऱ्यांनी सगळ्यांनाच चकवा दिला आहे. या अधिकाऱ्यांच्या गाडीवर "कृषी अभ्यास शिबीर" असा बोर्ड लावलेला होता. मोठ्या अक्षरात ठळकपणे काचेवर लावलेला हा फलक पाहून कुणालाही शंका येणे शक्य नव्हते. शेतीविषयक अभ्यासाचे काही शिबीर असेल आणि त्यासाठी कुणी आले असेल असे सहज वाटून जात होते. अचानक आलेल्या गाड्या अनेकांनी पहिल्या असल्या तरी कुणालाही याची सुतराम शंकाही आली नाही. नंतर मात्र सत्य समजले आणि सगळेच हादरून गेले. 


आज पहाटेच कृषी अभ्यास शिबिराचे फलक लाऊन अधिकारी या गाडीतून धाराशिव साखर कारखान्यावर आले. शिबिराच्या या फलकावर '२४ ऑगष्ट ते ३० ऑगष्ट' दरम्यान हे कृषी शिबीर असल्याचा देखील उल्लेख आहे. एकूण पाच गाड्यातून २० पेक्षा अधिक अधिकारी येथे धडकले असून अभिजित पाटील यांच्या विविध संस्थांची चौकशी करीत आहेत. स्थानिक आयकर अधिकाऱ्यांना या धाडीबाबत कसलीही माहिती न देता थेट आलेले हे अधिकारी पुणे आणि दिल्ली येथून आले आहेत. (The income tax authorities made a tactical foray) जालना येथे 'वऱ्हाडी' बनून आलेले आयकर अधिकारी येथे मात्र कृषी शिबिराची हुलकावणी देत पोहोचले आहेत.  


दरम्यान पंढरपूर येथेही अभिजित पाटील यांच्या घरासह विविध संस्थामधून छापेमारी सुरु असून बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अभिजित पाटील यांच्या घरावर आणि संस्थावर आयकर विभागाच्या धाडी पडण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या धाडीबाबत मात्र तर्क वितर्क आणि चर्चा सुरु झाल्या आहेत. अभिजित पाटील हे राजकीय पटलावर ठळक दिसू लागले होते, शिवाय पोट निवडणुकीत निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत शिवाय शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचे अभिजित हे भाचे आहेत. त्यामुळे या धाडीला राजकीय रंग देखील मिळू लागला असून तशा प्रकारची चर्चा पंढरपूर परिसरात ऐकायला मिळू लागली आहे. या धाडीमुळे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून काही राजकीय नेतेही धास्तावले असल्याचे सांगण्यात येत आहे.  


 सोलापुरातही धाडी !
पंढरपूर, उस्मानाबादसह आज सोलापूर येथे देखील आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. सोलापूर शहरात दोन प्रसिद्ध डॉक्टर आणि एक बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालयावर आयकर Income Tax Department)विभागाने धाड टाकली आहे त्यामुळे सोलापूर शहरातही खळबळ उडाली आहे. हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे, डॉ. अनुपम शहा तसेच बांधकाम व्यावसायिक बिपीन पटेल यांच्या कार्यालावर ही धाड पडली असून तपासणी आणि चौकशी सुरु आहे.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !