BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ फेब्रु, २०२२

महावितरणचे अभियंता कुटुंबासह सुखरूप सापडले !



पंढरपूर  : कुटुंबासह आत्महत्या करण्याची सूचना देवून बेपत्ता झालेले महावितरणचे  सहायक अभियंता आपल्या कुटुंबासह पोलिसांना सापडले असून पोलीस त्यांना घेवून पंढरपूरच्या दिशेने येत आहेत.  


महावितरणच्या भोसे शाखेत कार्यरत असलेले सहायक अभियंता गणेश वगरे कुटुंबासह बेपत्ता झाल्याने त्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी देखील तातडीने त्यांचा तपास सुरु केला आणि प्राप्त माहितीनुसार  अखेर आज कर्नाटक राज्यात त्यांचा तपास पोलिसांना लागला. आता पोलीस या कुटुंबाला घेऊन पंढरपूरकडे येत आहेत. अभियंता वगरे आणि त्यांचे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.  पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन पथके तयार होती आणि  अत्यंत बारकाईने पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. वगरे यांचे कॉल रेकोर्डिंग, टोळ नाके आणि फास्ट टॅग या सगळ्यांची तपासणी करण्यात येत होती. महावितरण कर्मचारी, वगरे यांचे नातेवाईक यांचीही पोलिसांना मदत होत होती शिवाय  लवकरच या कुटुंबाला शोधून काढू असा विश्वास उप विभागीय पोलीस अधिकरी विक्रम कदम यांनी व्यक्त होता. 


अत्यंत जलद गतीने पोलिसांनी हा तपास केला असल्याने पोलीस अभिनंदनास पात्र ठरले आहेत पण आता एक नवा अध्याय सुरु होणार आहे. त्यांना नक्की कुणी मानसिक त्रास दिला आहे ? त्यांनी अशा प्रकारचे पाउल उचलण्याआधी पोलिसांची मदत का घेतली नाही ? त्यांनी केलेल्या आरोपाचे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता शोधावी लागणार आहेत. एकूण प्रकरणाबाबत ते पोलिसांना काय जबाब देतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.  


आधीचे वृत्त !

महावितरणच्या भोसे येथील शाखेचे सहाय्यक अभियंता गणेश वगरे हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह गुरुवारी ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी  बेपत्ता झाले आहेत. त्यांनी काही लोकंची नावे नमूद करून आपण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे अशी सूचना देवून वगरे कुटुंब कालपासून बेपत्ता झाले आहे. करकंब पोलीस त्यांचा शोध घेत असून काल ३ फेब्रुवारीस सायंकाळी वगरे यांचे शेवटचे लोकेशन सांगोला तालुक्यात असल्याचे दिसून आल्याने सांगोला पोलिसांना देखील सतर्क करण्यात आले आहे. वगरे कुटुंबाचा मोबाईल देखील नॉट रिचेबल असल्याने चिंता वाढली असून करकंब आणि भोसे परिसरात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. 


महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता असलेल्या वगरे यांनी आपण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा दृढ निश्चय केला असल्याचे म्हटले आहे त्यामुळेच अधिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करीत हेच लोक आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यामुळेच आपण आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील रहिवाशी, एका संघटनेचा पदाधिकारी आणि त्याचा भाऊ यांच्यामुळे आपणास प्रचंड मानसिक त्रास होत आहे. विजेचे बिल न भरल्यामुळे वायरमन यांनी त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या रागातून हा त्रास दिला जात आहे. स्थानिक वर्तमानपत्रात बातम्या छापून आणून आपली नाहक बदनामी केली जात आहे . या बदनामीमुळे आपण आणि आपले कुटुंब नैराश्यात गेलो आहोत. याच नैराश्यातून आपण पत्नी आणि दोन मुलींसह जीवनयात्रा संपविण्याचा दृढनिश्चय केला आहे असे त्यांनी म्हटले आहे. 


एका संघटनेचा पदाधिकारी, त्याचा भाऊ आणि दोन पत्रकार यांनी आपणास आत्महत्येस प्रवृत्त केले असून आपल्या पाठीमागे माझी नाहक बदनामी करणाऱ्याना कुठल्याही प्रकारची दया दाखवू नये, माझे हसते खेळते कुटुंब त्यांच्या नाहक त्रासामुळे उध्वस्त होत आहे. समाज माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत होता पण आता तो संशयाने पाहत आहे त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, त्यातूनच हे टोकाचे पाउल उचलत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. वगरे हे मुळचे पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी येथील आहेत. पांढरेवाडी येथील सरपंच दगडू कांबळे, माजी सरपंच सज्जन भोसले, महावितरणचे कर्मचारी आदींनी वगरे यांची पोस्ट पाहून काल  करकंब  पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी देखील तातडीने या प्रकरणाची दखल घेत तपास सुरु केला पण वगरे यांचा शोध लागला नाही. 


सांगोला तालुक्यातील वाटंबरे- निजामपूर रोड परिसरातील त्यांचे लोकेशन मिळाले पण वगरे यांनी आपला मोबाईल बंद ठेवलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वगरे यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या हुंडाई गाडी (एम एच १२, एस क्यू ३८१६) आहे. अशी गाडी अथवा संबंधित कुटुंब यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.  या घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडवून दिली असून करकंब तसेच पांढरेवाडी परिसरातून अधिक चिंता व्यक्त होताना दिसत आहे. पोलीस मात्र सर्व मार्गाने वगरे कुटुंबाची माहिती मिळविण्याचा आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.        


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !