BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ फेब्रु, २०२२

रिफ्लेक्टरअभावी अपघात, तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू !



श्रीगोंदा : ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागच्या बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 


ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर म्हणजे यमदूत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून ऊसाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर मालकाच्या बेफिकिरीने तिघांचे जीव जाण्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. मित्राला सोडविण्यासाठी निघालेल्या गाडीला हा जोरदार अपघात झाला आणि या अपघातात कारमधील तिघांनाही जागीच मृत्यू आला आहे. या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत असून ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या बेपर्वाईबद्धल संताप व्यक्त होत आहे. आजवर अशा वाहनांमुळे अनेक अपघात घडले असताना आता त्यात आणखी एका अपघाताची आणि तिघांच्या मृत्यूची भर पडली आहे. 


आपल्या केशव सायकर (वय २२) या काष्टी येथील मित्राला सोडण्यासाठी राहुल सुरेश आळेकर  (वय २२, रा. श्रीगोंदा) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८, रा. श्रीगोंदा) हे कार घेऊन काष्टी या गावी निघाले असताना हा अपघात झाला. भरधाव वेगाने निघालेल्या कारने ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर होऊन तिघेही मित्र जागीच ठार झाले. ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावलेला नसल्याने कार चालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज आला नाही त्यामुळे थेट कार ट्रॉलीवर जाऊन आदळली आणि हा भीषण अपघात घडला.  


सदर कार काष्टीकडे निघालेली असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. श्रीगोंदा ते दौंड दरम्यानचा रस्ता रुंद आणि सिमेंट काँक्रीटचा बनवला असल्यामुळे या मार्गावरून वाहने अत्यंत वेगाने धावत असतात. त्यातच उसाची वाहतूक करणारी वाहने देखील याच मार्गावरून जात असतात. ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूस रिफ्लेक्टर लावलेले नसतात आणि त्यामुळे वेगातील वाहनांना समोरचे ट्रॅक्टरचा अंदाज येत नाही. अगदी जवळ आल्यावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसला तरी तेवढ्यात वेगवान वाहन नियंत्रित करता येत नाही त्यामुळे अपघात होत आहेत. 


वेगाने ऊसाच्या ट्रॉलीवर कार आढळल्यामुळे कारचा चक्काचूर झाला आहे आतील तिघांचा क्षणात मृत्यू ओढवला आहे.  'हॉटेल अनन्या' समोरून जात असताना हा अपघात झाला आणि यावेळी जोरदार आवाज देखील झाला. रात्रीच्या वेळी हा अपघात झाल्याने दूरपर्यंत आवाज गेला आणि परिसरातील नागरिक धावत अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने दाखल झाले आणि त्यांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढले.  अपघाताचे भयानक दृश्य पाहून प्रत्येकाच्या हृदयाचा थरकाप होत होता. गाडीचा झालेला चक्काचूर पाहता गाडी किती वेगात असेल याचाही अंदाज येत आहे. 


आपल्या एका मित्राला त्याच्या गावी सोडण्यासाठी निघालेल्या दोन मित्रासह तिघांचाही मृत्यू झाल्याने श्रीगोंदा तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तीनही तरुण मित्र असून दोघांचे वय २२ तर एकाचे वय अवघे १८ वर्षांचे आहे. या घटनेने श्रीगोंदा आणि काष्टी गावावर अक्षरश: शोककळा पसरली आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अत्यंत बेपर्वाईने ट्रॅक्टर वापरतात आणि चालवतात त्याबद्धल प्रचंड संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !