मंगळवेढा : गाडीत दारूचा मोठा साठ बाळगून असलेल्या नंदेश्वर येथील माजी उप सरपंचाला पोलिसांनी छापा टाकून पकडले असून राहुल सयाप्पा कसबे याला ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील नंदेश्वर येथे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये दारूचा मोठा साठा असल्याची माहिती मंगळवेढा उप विभागीय अधिकारी राजश्री पाटील यांना मिळाली होती. नंदेश्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या गाडीत दारूचा साठा घेऊन थांबलेला असल्याची गुप्त माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी लगेच पुढील कार्यवाही सुरु केली आणि पोलीस कर्मचाऱ्यांना नंदेश्वरकडे रवाना केले. पोलीस खाजगी वाहन घेवून नंदेश्वर येथे गेले असता त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी दिसून आली. त्यामुळे मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री पोलिसांना झाली.
पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यांना दारूचा मोठा साठां आढळून आला. बारा बॉक्समध्ये असलेल्या देशी संत्रा दारूच्या ५७६ सीलबंद बाटल्या या गाडीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी गाडीला गराडा घालून ही कारवाई केली आणि नंदेश्वर येथील माजी उप सरपंच राहुल कसबे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हुन्नूर येथून सरकारमान्य देशी दारूच्या दुकानातून हे दारूचे बॉक्स आणले असल्याचे सांगितले. पोलिसांनी कारसह ५ लाख ३४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून माजी उपसरपंच राहुल कसबे याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. गावाचा कारभार हाकणाऱ्या माजी लोकप्रतिनिधीकडेच अवैध दारू सापडू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंगळवेढा तालूक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यावर लगाम लावण्यासाठी पोलिसांनी मोहीमच हाती घेतली आहे. दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ७५ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. आणखीही काही जण पोलिसांच्या लिस्टवर असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. एकीकडे ही मोहीम सुरु असली तरी हातभट्टी दारूचे अड्डे आणि अन्य अवैध व्यवसाय मात्र खुलेआम सुरु आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई केली जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नंदेश्वर येथील माजी उप सरपंच असलेल्या कसबेकडे दारूचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली असून गावाचे लोकप्रतिनिधीच अवैध प्रकारात असल्याने मंगळवेढा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !