अहमदाबाद : वेस्ट इंडीज विरुद्ध एक दिवशीय क्रिकेट मालिका खेळण्यास दोन्ही संघ सज्ज असताना भारतीय संघातील आठ खेळाडूना कोरोनाने सामन्याआधीच बोल्ड आउट केले आहे. त्यामुळे सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आले आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला एक दिवशीय सामना ६ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे पण त्याआधीच ही मोठी बातमी समोर आली आहे. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर यांच्यासह ८ खेळाडू कोरोना बाधित आढळले आहेत. मालिका अवघ्या चार दिवसावर आल्यानंतर ही बाब समोर आली आहे. भारत आणि इंडीज हे दोन्ही संघ एकाच हॉटेलमध्ये थांबलेल्या आहेत. जेंव्हा हॉटेलमध्ये खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तेंव्हा सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते पण त्यानंतर भारतीय संघातील आठ जणांचे अहवाल आले आणि कोरोनाने भारतीय संघात दमदार घुसखोरी केली असल्याचे उघड झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात आली होती. खबरदारीचे सर्व उपाय योजले जात होते तरीही एकदम आठ खेळाडू बाधित असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. भारतीय संघासाठी १८ खेळाडूंची घोषणा या आधीच करण्यात आली आहे, कोरोनाची तिसरी लाट असल्याने खबरदारी म्हणून निवड समितीने आधीच हा खबरदारीचा उपाय योजला होता. आक्रमक फलंदाज शाहरुख खान आणि फिरकी गोलंदाज रविकृष्णन साई किशोर या दोन खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून समावेश केलेला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यात सपोर्ट स्टाफमधील पाच जणांचा समावेश असून या मालिकेवर कोरोनाचे अनिश्चिततेचे मोठे सावट आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही एक दिवशीय मालिका खेळली जाणार की रद्द केली जाणार हा प्रश्न सद्या पडलेला आहे. संघात जर कोरोनाच्या भीतीचे वातावरण असेल तर मालिका रद्द केली जाऊ शकते. इंग्लंडमधील कसोटी क्रिकेट मालिकेच्या वेळी देखील असा प्रसंग आला होता. चार कसोटी सामने झाल्यानंतर भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पाचवी कसोटी रद्द करण्यात आली होती. भारतीय संघ कोरोनामुळे धास्तावल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. आता तर एक दिवशीय मालिका सुरु होण्यापूर्वीच कोरोनाने भारतीय संघावर आक्रमण केलेलं आहे त्यामुळे मालिका रद्द होण्याचीच अधिक शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !