पंढरपूर : बार्शीच्या विशाल फटेचा घोटाळा राज्यभर गाजत असतानाच पंढरपूर येथे देखील असाच प्रकार घडल्याचे समोर येत असून दोघांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शीचा कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा घोटाळा गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाजत गाजत आहे तोच सोलापूर जिल्ह्यातील दुसरी घटना समोर येऊ लागली आहे. सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखला झाली आहे आणि आणखी किती तक्रारी दाखल होत आहेत हे येत्या काळात पहावे लागणार आहे. 'माझ्या संकल्प पतसंस्थेत गुंतवणूक करा, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून दुप्पट करून देतो' असे आमिष दाखवून पतसंस्थेचे चेअरमन प्रथमेश कट्टे आणि त्याचा सहकारी शुभम कोरके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून अशा प्रकारे आणखी किती लोकांना फसविण्यात आले आहे याची माहिती येणे बाकी आहे.
पंढरपूर येथील संकल्प पतसंस्थेचे चेअरमन प्रथमेश कट्टे आणि त्याचा साथीदार शुभम कोरके यांनी गुंतवणूकदारांना सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून करून रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले असल्याबाबत अंबाबाई पटांगण येथील सुनील दशरथ भिसे यांनी फिर्याद दिली आहे. दाखवलेल्या आमिषामुळे भिसे यांनी ९ सप्टेंबर २०१९ रोजी संकल्प पतसंस्थेत १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
मार्च २०२० मध्ये या गुंतवणुकीस सहा महिने पूर्ण झाल्यानंतर भिसे यांनी रक्कम मागितली असता त्यांना त्यांची रक्कम मिळाली नाही. प्रथमेश कट्टे हा त्यांची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागला. दुप्पट रकमेचे आमिष दाखवले म्हणून भिसे यांनी पंधरा लाख संकल्प पतसंस्थेत गुंतवले पण ठरलेली मुदत संपली तरी रक्कम मिळत नसल्याचे पाहून भिसे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार कट्टे आणि कोरके यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखला करण्यात आला आहे. बार्शीच्या विशाल फटेचे प्रकरण ताजे असतानाच तशाच प्रकारे फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदार भिसे यांनी केली असून या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
फसवणूक झाल्याचा आरोप करीत सुनील भिसे हे समोर आले आहेत परंतु आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे आणि हा नेमका किती रकमेच्या घोटाळ्यांचा 'संकल्प' आहे हे पोलीस तपासात उघड होणार आहेच पण या घटनेने गुंतवणूकदार मात्र धास्तावून गेले आहेत. यापूर्वी शहरातील अनेक पतसंस्था बंद पडलेल्या आहेत शिवाय अशा प्रकारे फसवणूक होत राहिली तर गुंतवणूकदारांचा विश्वास संपुष्टात येणार आहे. वारंवार उघडकीस येणारे घोटाळे पाहून गुंतवणूकदार आधीच तणावात असतात त्यात पंढरपूर मध्ये अशा प्रकारची तक्रार झाल्याने आणखीच हादरा बसला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !