BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ फेब्रु, २०२२

पंढरपूर- सांगोला रस्त्यावर अपघातात आणखी एक बळी !

 



पंढरपूर : मांजरी येथील अपघाताच्या पाठोपाठ पंढरपूर- सांगोला रस्त्यावर आणखी एक अपघात घडला असून यात ४५ वर्षिय महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 


मृत्यूचा महामार्ग बनलेला पंढरपूर - सांगोला मार्ग रुंद आणि सिमेंटचा झाल्यापासून वाहन चालकाना वेगाचे भान उरले नसून अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, नव्याने तयार करण्यात आलेल्या सर्वच रस्त्यांवर सतत अपघात होत आहेत परंतु पंढरपूर - सांगोला मार्ग केवळ अपघातासाठीच आहे की काय असा प्रश्न पडण्याएवढे अपघात होत आहेत आणि अनेकंचे प्राण जात आहेत. खर्डी परिसर, फॅबटेक परिसर, हॉटेल चंद्रमाला परिसर ही या मार्गावरील अपघाताची प्रमुख ठिकाणे ठरू लागली आहेत.  अत्यंत वेगाने धावणारी वाहने माणसांना चिरडून जात आहेत. बामणी, मांजरी या गावाजवळ असलेली वळणे देखील धोकादायक असून वेगाने येणाऱ्या वाहनास पुढचा रस्ता दिसत नाही आणि ज्या वेळेस दिसतो त्या वेळेला वाहन नियंत्रणात आणू शकत नाही. 


सांगोला मार्गावर मांजरी गावाजवळ झालेल्या अपघाताची चर्चा थांबण्यापुर्वीच आणखी एक अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील पती पत्नी यांच्यासह तिघेजण जखमी झाले आणि त्यातील अनिता जगन्नाथ जाधव या ४५ वर्षे वयाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. दहा वर्षे वयाचा मुलगा मात्र या अपघातातून आश्चर्यकारक बचावला आहे. सांगोला तालुक्यातील बामणीच्या जाधव वस्ती येथे राहणारे जगन्नाथ जाधव हे पत्नी अनिता जाधव आणि वर्षा घायाळ तसेच दहा वर्षे वयाचा अजिंक्य घायाळ असे चौघे जण दुचाकीवरून प्रवास करीत होते. रेल्वेच्या बोगद्याखलुन  वळसा  घेऊन ते सांगोल्याकडे जात असताना पंढरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि अपघात झाला. 


कारची जोराची धडक बसताच दुचाकीवरी अनिता जाधव या उडून रस्त्यावर पडल्या आणि यावेळी त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. तातडीने उपचारासाठी सांगोला रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जगन्नाथ जाधव, वर्षा घायाळ यांनाही या अपघातात जोरदार मार लागला असून दहा वर्षे वयाचा अजिंक्य घायाळ हा मुलगा मात्र सुदैवाने बचावला आहे. अपघात होताच तो दूर फेकला गेला आणि बचावला. बिलेवाडी पाटीजवळ हा अपघात झाला असून या परिसरात या आधीही अनेक अपघात झाले आहेत. 


सलग दुसरा अपघात

शेतातून गवत घेऊन येणाऱ्या ७५ वर्षे वयाच्या शेतकऱ्यास पाठीमागून येणाऱ्या कारने जोरात धडक दिल्याने शेतकरी वृद्धाचा आदल्या दिवशीच  मृत्यू झाला आहे. मांजरी येथे झालेल्या या अपघातात वृद्ध शेतकऱ्यास आपला प्राण गमवावा लागला आहे. नामदेव हरी चव्हाण हे शेतकरी शेतातून गवत घेऊन सायकलवरून घराकडे निघाले होते. ते या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून पंढरपूरकडून सांगोल्याकडे जात असलेल्या भरधाव कारने त्यांना उडवले आणि ते खाली पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला. या अपघातात ते जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने सांगोला येथे रुग्णालयात नेले परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. सदर प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील कार चालक संतोष मच्छिन्द्र शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !