पंढरपूर : मृत्यूचा महामार्ग ठरत असलेल्या पंढरपूर - सांगोला मार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला असून सायकलस्वार वृद्धास धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
पंढरपूर - सांगोला मार्ग रुंद आणि सिमेंटचा बनविल्यापासून वाहन चालकाना वेगाचे भान उरले नसून अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, नव्याने तयार करण्यात आलेल्या सर्वच रस्त्यांवर सतत अपघात होत आहेत परंतु पंढरपूर - सांगोला मार्ग केवळ अपघातासाठीच आहे की काय असा प्रश्न पडण्याएवढे अपघात होत आहेत आणि अनेकंचे प्राण जात आहेत. खर्डी परिसर, फॅबटेक परिसर, हॉटेल चंद्रमाला परिसर ही या मार्गावरील अपघाताची प्रमुख ठिकाणे ठरू लागली आहेत. अत्यंत वेगाने धावणारी वाहने माणसांना चिरडून जात आहेत. बामणी, मांजरी या गावाजवळ असलेली वळणे देखील धोकादायक असून वेगाने येणाऱ्या वाहनास पुढचा रस्ता दिसत नाही आणि ज्या वेळेस दिसतो त्या वेळेला वाहन नियंत्रणात आणू शकत नाही.
शेतातून गवत घेऊन येणाऱ्या ७५ वर्षे वयाच्या शेतकऱ्यास पाठीमागून येणाऱ्या कारने जोरात धडक दिल्याने पुन्हा एकदा एक मृत्यू या मार्गावर झाला आहे. मांजरी येथे झालेल्या या अपघातात वृद्ध शेतकऱ्यास आपला प्राण गमवावा लागला आहे. नामदेव हरी चव्हाण हे शेतकरी शेतातून गवत घेऊन सायकलवरून घराकडे निघाले होते. ते या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून पंढरपूर कडून सांगोल्याकडे जात असलेल्या भरधाव कारने त्यांना उडवले आणि ते खाली पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला. या अपघातात ते जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने सांगोला येथे रुग्णालयात नेले परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. सदर प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील कार चालक संतोष मच्छिन्द्र शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !