BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

कार्टून चित्रपटांचा जनक वाॅल्ट डिस्ने यांनी केले होते घरोघरी पेपर टाकण्याचे काम !



चित्रपटांचं आजचं तत्र विकसित आहे, जे काही करायचं मनात येईल ते करण्याची साधनं उपलब्ध आहेत परंतू एकेकाळी पडद्यावरचा चित्रपट हा कुतुहलाचा विषय बनलेला हाेता. प्रथम मूकपट आला तेंव्हा त्याची नवलाई काही औरच हाेती. माणसांची चित्र पडद्यावर हालचाली करतात हे पाहून सर्वांनाच नवल वाटत हाेतं. ही नवलाई टिकून असतानाच पुढे पडद्यावरील माणसांची ही चित्र बाेलू लागली आणि सगळे अवाक् हाेऊन पहात राहीले. माणसांच्या कल्पनेपलिकडचं हे माणसांच्याच कल्पनेतून साकारलेलं हाेतं. 


लहान मुलं आज आवडीने कार्टून पाहतात, मोठी माणसं देखील याकडे सहजपणे पाह्तात. निर्जीव चित्रांना चालयला बोलायला लावणं ही सोपी बाब नाहीच पण कार्टूनमधील व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावर भाव देखील उमटतात. कधीकाळी कल्पनाही अशक्य वाटणारी बाब आज सामान्य होऊन बसली आहे पण हे अद्भुत विश्व साकारलं कुणी? वाॅल्ट डिस्ने नावाच्या कुंचल्याच्या एका जादुगाराने! वाॅल्ट डिस्ने यांना सुरुवातीच्या काळात अपमानित व्हावं लागलं, घरोघरी जाऊन पेपर टाकण्याचं काम देखील करावं लागलं!  सातत्याने आणि राेज नवनव्या कल्पना चित्रपटात वापरल्या जातात त्यामुळं त्याचं तितकसं माेल आणि महत्वही वाटत नाही पण त्याकाळी असं सगळं काही प्रथमच अनुभवायला मिळत हाेतं आणि त्याचं अप्रुपही तेवढंच हाेतं. हे चित्रपट कुणाला आवडाे अथवा न आवडाे पण कार्टून चित्रपट अबालवृध्दांना आवडतात. लहान मुलं दूरदर्शनच्या पडद्यापासून हटायला तयार हाेत नाहीत तर वृध्दापर्यंत सगळेच माेठ्या गमतीनं ही कार्टून पहात असतात. विविध मासिक, साप्ताहिकांतून तसंच दिवाळी अंकातून व्यंगचित्र भरपूर पहायला मिळतात आणि त्यांचा आनंदही मिळत असताे.


व्यंगचित्र स्थिर असतात पण हीच व्यंगचित्र कधी चालू बाेलू लागतील असंही कधी कुणाला वाटलं नसेल. त्याकाळी याबाबत काहीही विचार येवाेत पण आजकाल अशी व्यंग असणारी चित्रे दूरदर्शनच्या पडद्यावर आणि चित्रपटगृहाच्या पडद्यावही आता मनाेरंजन करू  लागले आहेत. जुन्या काही चित्रपटांच्या विशेषत: विनाेदी चित्रपटांच्या  नामावलीमध्ये अशी व्यंगचित्रे गंमत आणीत हाेती. हळूहळू दूरदर्शनच्या पडद्यावर ही व्यंगचित्रे गमतीदार हालचाली करीत बाेलू लागली आणि भरपूर मनाेरंजनही करू लागली. अशा चित्रांच्या काही मालिकाही दूरदर्शनच्या पडद्यावर पहायला मिळाल्या. आजतर त्यासाठी स्वतंत्र वाहिन्या कार्यरत आहेत आणि त्या बच्चेकंपनीच्या पसंतीच्या बनल्या आहेत. पुन्हा पुन्हा पाहिलं तरी कंटाळा येत नाहीच उलट पुन:प्रत्ययाचा आनंदच देतात. ही चित्र अपेक्षित परिणाम साधू लागल्यामुळं याचा वापर जाहिरातीतूनही हाेऊ लागला आहे.


चालणारी बाेलणारी कार्टून्स भरपूर मनाेरंजन करतात हे खरं असलं तरी त्याचा जन्म कसा झाला, या चित्रांना चालायला बाेलायला लावणारा खरा धनी काेण याकडे काेणीही गांभिर्याने पाहताना दिसत नाही. अशा व्यंगपटांच्या निर्मितीत वाॅल्ट डिस्ने याचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. खरं तर या धम्माल कलाकृतीचे जनकच ते आहेत. वाॅल्ट डिस्ने यांनी १९०८ साली 'फ्रँटॉन्समाॅ माेरियल’ हा व्यंग चित्रपट तयार केला हाेता. हा चित्रपट केवळ शंभर फुटाचा हाेता पण त्यासाठी त्यांना दाेन हजार सुटी चित्रे तयार करण्यात आली हाेती. ज्यावेळी मानवी कलावंत चित्रपटात काम करताे तेंव्हा अर्ध्या मिनीटांचा एखादा प्रसंग सहजपणे चित्रीत करता येताे पण अशा व्यंग, कार्टून चित्रपटांसाठी जेंव्हा अर्ध्या मिनीटांसाठी चित्रिकरण करावं लागतं त्यासाठी प्रत्येक व्यक्तीरेखेची विविध हालचाली दर्शविणारी कमीतकमी एक हजार चित्रे तयार करावी लागत. अवघ्या अर्ध्या मिनीटाच्या चित्रपटासाठी हजाराे चित्र तयार करावी लागत हाेती तर संपूर्ण चित्रपटांसाठी किती चित्रे तयार करण्याचे काम त्यांना करावे लागले असेल याचा अंदाजही करता येत नाही. केवळ हालचालींना महत्व देऊनच काम भागत नव्हते तर त्या प्रत्येक चित्रांत त्या त्या प्रसंगानुरूप चेहऱ्यावर तसे भाव दाखविणेही सर्वाधिक महत्वाचे हाेते. हे सगळं करीत असताना चित्रांच्या चेहऱ्यात कसलाही फरक न पडू देणे महत्वाचे हाेते. इतकी बारीक दक्षता घ्यावी लागत हाेती. 


चेहरा हलता बाेलता तर ठेवलाच पाहिजे परंतू तरीही त्यात मूळ चेहऱ्यात कसलाही बदल हाेणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक हाेते. हे सगळं काही सांभाळण्यासाठी अशा प्रकारची चित्रे काढणं हेच माेठं कसब हाेतं. हल्लीच्या संगणकाच्या काळात काहीही करणे अशक्य उरले नाही पंरतू त्याकाळी जेंव्हा संगणक नव्हता तेंव्हा हे सगळं केलं जात हाेतं हे विशेष आहे. आजच्या काळात याचं फारसं महत्व वाटणारही नाही कदाचित परंतू त्याकाळी हाताने या सर्व बाबी साकाराव्या लागत हाेत्या आणि आजच्या एवढंच ते काम प्रभावी हाेत हाेतं.


वाॅल्ट डिस्ने  याने केलेली ही असाधारण किमया हाेती पण स्वत: वाॅल्ट डिस्ने हा सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सामान्य मुलगा हाेता. घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची. वडील बिल्डींग काँट्रॅक्टर हाेते पण त्यांचे दिवस फिरले  हाेते. दहा वर्षांचे वय असताना वाॅल्ट डिस्नेलाही काही कमाई करण्याची गरज निर्माण झाली हाेती आणि त्यासाठी त्याने ‘सिटी स्टार’ नावाचं दैनिक घराेघरी पाेहाचविण्याचं काम पत्करलं हाेतं. प्रत्येकाच्या घरात वर्तमानपत्र टाकल्यानंतर ताे आपल्या  शाळेत जायचा. ताे शाळा शिकत असला तरी त्याला चित्रकलेचा विशेष छंद हाेता आणि हा छंद ताे आपल्या सगळ्या धावपळीनंतही सांभाळायचाच. 


आपण चांगली चित्र काढू शकताे याची जाणीव त्याला झाल्यावर त्याने वर्तमानपत्र घराेघरी टाकण्यापेक्षा वृत्तपत्र कार्यालयातच चित्रकार म्हणून काम करावं असा विचार त्याने केला आणि ‘सिटी स्टार’ या वृत्तपत्राच्या संपादकांना भेटून आपल्या कुंचल्याची अद्भुत किमया साकार करण्याची संधी मिळण्याची मागणी केली. संपादकांनी वाॅल्टने काढलेली चित्र पाहून संपादकांचा चेहरा विचित्र झाला आणि बिच्चाऱ्या वाॅल्ट डिस्नेला कार्यालयातून मुकाटपणे बाहेर पडावं लागलं. हा वाॅल्ट डिस्ने दिशाहिन हाेऊन एका चर्चच्या पायरीवर बसलेला हाेता. तसा ताे खचूनही गेलेला हाेता पण त्याची ही अवस्था एका पाद्रीने पाहिली आणि त्याची चाैकशी केली. वाॅल्टचे दु:ख ऐकून पाद्रीने त्याला चर्चच्या भिंतीवर चित्रे काढायला सांगितली. पाद्री म्हणाला, ‘चर्चच्या या भिंतीवर तुला वाटतील ती चित्रे काढ, आज तू पैशासाठी चित्र काढीत असलास तरी तुझ्यातूनच कदाचित उद्याचा महान चित्रकारही निर्माण हाेईल..’ हा अंदाज खरा ठरला आणि वाॅल्ट डिस्ने हा जगविख्यात चित्रकार म्हणून लाैकिकप्राप्त झालाही..!


वाॅल्ट डिस्ने चित्रपट विषयक एका जाहिरात कंपनीत काम करीत असताना ‘अ‍ॅलिश इन कार्टून लँड’ हा पहिला सुमारे दहा मिनीटाचा कार्टून चित्रपट त्याने तयार केला. त्यानंतर त्याने ‘लिटील रेड राइडिंग हूड’ हा असाच एक चित्रपट बनवला आणि या चित्रपटाने त्यालाअमाप पैसा मिळऊन दिला.व्यंगचित्रपट निर्मितीत ताे या पैशांवर आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहू शकला आणि मग त्याचा हा प्रवास नव्या उमेदीने सुरू झाला. त्याचे कार्टून्स चांगलेच गाजले ,त्याच्या या चित्रपटातील कार्टून मानवांचे हाेते. आज आपण अशा चित्रपटांत हव्या त्या प्राण्यांना पाहू शकताे परंतू या प्राण्यांना सर्वप्रथम वाॅल्ट डिस्ने यानेच चित्रपटांत कामे दिली. या प्राणी कलावंतांना आज चांगलीच लाेकप्रियता मिळाली आहे, घरात काेनाड्यात खुडबुड करणारे उंदीरसुध्दा आज पडद्यावर मनाेरंजन करीत आहेत ही या वाॅल्टचीच कृपा ! 


मिकी माऊस म्हटलं की लहान मुलांच्या डाेळ्यासमाेर हा माऊस उभा राहताे. या मिकी माऊसचा जन्मदाता हा वाॅल्ट डिस्नेच आहे आणि या जन्माची कथाही तेवढीच रंजक आहे. अस्सल कलावंताना कशातून काय दिेसेल आणि सुचेल हे सांगता येत नाही. वाॅल्ट आपल्या स्टुडिओत काम करीत असतान एक उंदीर त्याला त्रास देत हाेता, सारखे इकडून तिकडे त्याची भ्रमंती चाललेली हाेती. उंदराचे हे खुडबुड करणं त्याच्या एकाग्रतेला भंग करीत हाेतं पण ताे त्याच्यावर रागावला नाही उलट त्याच्याकडे टक लाऊन पहात राहीला. पाेटासाठी भटकणाऱ्या या उंदराला ताे खाऊ घालू लागला आणि नंतर हाच उंदीर वाॅल्टचा मित्र बनला. बिनधास्तपणे हा उंदीर वाॅल्टकडे येऊ लागला. वाॅल्टने याच उंदराचे एक चित्र काढले आणि व्यंग चित्रपटांत त्याला भूमिका देण्यासाठी मग त्याने मिकी माऊसची हजाराे चित्रं काढली. ‘मिकी माऊस’ हा वाॅल्ट डिस्नेचा चित्रपट १९२८ साली प्रदर्शितही झाला. पडद्यावरच्या मिकी माऊसला पाहून मुलं आनंदानं नाचायला लागली आणि या चित्रपटाला एवढी लाेकप्रियता लाभली की एका वर्षात वाॅल्टचे नाव अमेरिकेतून जगात पाेहाेचले. उभ्या जगानं मिकी माऊस ला डाेक्यावर घेतलं आणि वाॅल्ट डिस्नेलाही तशीच मानाची जागा मिळाली.


‘मिकी माऊस’नं वाॅल्टला सगळं काही दिलं पण अचानक सुरू झालेल्या युध्दामुळे त्याच्यावर संकट आले पण ताे त्यातूनही सावरला. पाचशे एकर जागेत त्याने मुलांसाठी ‘अद्भुत नगरी’ उभारली. माेठी उद्याने, निळे जलाशय, विश्रामगृहे असं संगळं काही हाेतं. या नगरीलाच आज डिस्नेलँड म्हणून ओळखलं जातं. या डिस्नेलँडच्या प्रवेशव्दारावरचं एक वाक्य प्रत्येकाला बरच काही सांगून जात हाेतं. त्यानं लिहीलं हाेतं, ‘ज्यांना मुलं आवडतात त्यांनाच प्रवेश आहे’ वाॅॅल्टचा हा प्रकल्प अगदीच अफलातून आहे.


 अमेरिकेतील  ३९ राष्ट्राध्यक्षांचे पुतळे येथे एकत्रित मांडण्यात आले आणि ‘ऑडिओ अ‍ॅनिमॅट्राॅनिक्स’ व्दारे हे पुतळे सजीव करण्यात येऊ लागले. आपल्या जागेवरून हे पुतळे उठून हस्तांदाेलन तर करायचेच पण भाषणंही देत असायचे. वाॅल्टच्या या कलेवर खुष हाेऊन लाेकांनी त्याला बक्षीसे आणि मानचिन्ह देत गाैरविले. ‘अ‍ॅलिस इन कार्टून लँड’(१९२२),, ‘मिकी माऊस’(१९२८), ‘डाेनाल्ड डक’(१९२८), ‘सिली सिफनी कार्टून्स’(१९२८), ‘फ्लावर्स अ‍ॅड ट्रीज’(१९३३), ‘द थ्री लिटल फिग्ज’(१९३३), ‘स्नाे व्हाईट अँड सेव्हन डाॅफ र्स’(१९३८), ‘व्हिक्टरी थ्रु एअर पाॅवर’(१९४३), ‘सिंट्रेला’(१९५०), ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’(१९५१), ‘टवेंटी थाऊजंड लेग्ज अंडर द सी’(१९५८), ‘टूट व्हीतल फ्लक अँड बूम’(१९५८), ‘डेव्हा क्राॅकेट’‘स्लीपींग ब्युटी’(१९५९), ‘स्वीस फॅमिली रॅबिन्सन’(१९६४), ‘मेरी पाॅपिन्स’(१९६४) असे काही वाॅल्टचे चित्रपट  खूपच गाजले आणि जगाला हा एक वेगळा कलावंत मिळाला. आजच्या संगणक युगात हे काही विशेष वाटत नसलं तरी असे चित्रपट बनविणे त्याकाळात केवळ असाधारणच हाेते आणि त्यामुळे वाॅल्ट डिस्ने चित्रपटाच्या या अनाेख्या दुनियेत अढळ स्थानावर राहीला. त्याची ही जागा आता कुणालाच घेता येणार नाही आणि तसे  परिश्रमही कुणी करणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !