BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ जाने, २०२२

'विठ्ठल' च्या साखर लिलावास स्थगिती !

 




पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उद्याचा साखर लिलावास न्यायालयाने स्थगिती दिली असून शेतकऱ्यांना असलेल्या 'एफआरपी' ची आशा पुन्हा मावळली आहे.  


पंढरपूर तालुक्याची आर्थिक जडणघडणीचा कणा असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रचंड अडचणीत सापडला असून त्यामुळे उस उत्पादकही आर्थिक अडचणीत आलेले आहेत. या वर्षी तर गाळप झालेच नाही पण मागील एफआरपीची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अर्थात राज्यात एफआरपी न दिलेले अनेक कारखाने आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे त्यामुळे सभासद शेतकरी देखील कोंडीत सापडला आहे. कारखान्याची साखर लिलाव करून शेतकऱ्याची देणी मिळण्याची आशा होती आणि उद्या २७ जानेवारीस हा लिलाव करण्यात येणार होता पण तो देखील न्यायालयाच्या आदेशाने स्थगित झाला आहे. 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे मागील वर्षाची ३० कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. यावर साखर आयुक्तांनी देखील ठोस आणि कडक भूमिका घेतली आहे. त्यानुसार विठ्ठल कारखान्याकडे असलेली साखर जप्त करून  तिचा लिलाव करण्याचा निर्णय झाला होता, आरसीसी अंतर्गत कारवाई करून शेतकऱ्यांची देणी दिली जाणार होती. उद्या २७ जानेवारी रोजी तहसीलदार लिलावाची प्रक्रिया पूर्ण करणार होते परंतु या लिलावास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम मिळणे पुन्हा लांबणीवर पडले आहे. 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचे कर्ज आहे आणि या बँकेने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत विठ्ठल कारखान्याच्या साखर लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे उद्याचा लिलाव आपोआप थांबला आहे. उच्च न्यायालयात पुढील सुनावणी ३ मार्च रोजी होणार आहे. गतवर्षीच्या हंगामात विठ्ठल सहकारीने ३ लाख टन उसाचे गाळप केले आहे आणि डिसेंबर २०२० पर्यंत गाळपास आलेल्या उसाचे २०५० प्रमाणे बिल देण्यात आलेले आहे. त्यानंतर म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात गाळपास आलेल्या उसाचे बिल थकित आहे. सदर रक्कम मिळावी म्हणून शेतकरी कारखान्याकडे खेटे घालत राहिले, शेतकरी संघटनांनी आंदोलने केली पण ही रक्कम मिळू शकली नाही. शेतकरी आणि संघटना यांनी जप्तीची कारवाई करण्याबाबत साखर आयुक्त यांच्याकडे मागणी केली होती. 


साखर आयुक्त यांनी एफआरपी रक्कम देण्याबाबत भूमिका घेत विठ्ठल साखर कारखान्यास नोटीसा बजावल्या. आरसीसी कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला. साखर आयुक्तांनी तीन नोटीसा कारखान्यास बजावल्या आणि त्यानंतर १ लाख ६ हजार क्विंटल साखरेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार उद्या २७ जानेवारीस साखरेचा लिलाव करण्यात येणार होता. या लिलावाकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून होते आणि आपली रक्कम मिळेल ही आशा त्यांना होती. दरम्यान या लिलावास स्थगिती मिळाल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. अर्थातच एफआरपीची रक्कम मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्याना दुसरा पर्यायाच उरलेला नाही.       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !