BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ जाने, २०२२

कोरोना गुरुजींच्या शाळेतही शिकायला मिळालं काही !







जीवन जगायचं म्हटलं की संकटं आलीच ! तसं पाहिलं तर ही संकटं म्हणजे जगण्याचाच एक भाग असतो ! अनेकदा येणाऱ्या आपत्ती या इष्टापत्ती ठरतात. वाईटातही काही चांगलं घडतं!  कोरोनाच्या बाबतीतही असंच काहीसं म्हणावं लागेल. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटांनं जगणंच काय पण मरणंही कठीण करून ठेवलंय. आत्ता कुठं या संकटातून बाहेर पडतोय असं वाटत होतं पण पुन्हा त्याच्या विळख्यात मानवजात गुदमरली ! दोन वर्ष होत आली पण मोकळा श्वास काही मिळत नाही. कोरोनाचे संकट परत निघाले असे वाटत असताना पुन्हा नवा विषाणू आला आणि पुन्हा मुक्त होत चाललेलं जीवन बंदिस्त होतंय की काय याची भीती मनामनात निर्माण झाली आहे. नाही नाही म्हणता म्हणता तिसरी लाट येऊन धडकली आणि --- 


जगण्यातलं सुख हिरावून घेत निराशेचं धुकं या कोरोनानं आजूबाजूला तयार केलं आणि धुक्यातून वाट शोधताशोधता माणसांचा जीव कासाविस झाला. निराशा, निराशा आणि फक्त निराशा ! रोज कुणीतरी गेल्याची बातमी कानावर पडत राहिली. जवळच्या माणसाच्या अखेरच्या दर्शनालाही जाता येईना, जो तो घरात बंदिस्त आणि कुलुपबंद ! अवघं जीवनच कोरोनाच्या साखळदंडाने जखडून टाकले. या कोरोनानं अत्यतं वाईट परिणाम भोगायला लावले हे खरेच. पण कोरोनानं एका वेगळ्या प्रकारे जगायला शिकवलं हे देखील तितकंच खरं ! प्रत्येक संकट माणसाला काही ना काही शिकवत असतं, नवी दिशाही देत असतं. पण माणूस त्याकडं त्या नजरेनं पाहत नाही. सुख लगेच विसरायचं आणि दु:ख चघळत बसायचं ही तर माणसांची सवय आहे. यामुळे जगण्यातला आणि सुखातलाही खरा आनंद मिळत नाही माणसाला ! वाईट घटना नेहमीच चांगली दिशा देवून जात असतात .. कोरोनानं सगळं काही हिरावलं असलं तरी काही शिकवलं आहे हे देखील तितकच खरं !   

 

तसं पाहिलं तर कुठल्याही बाबीला दोन बाजू असतात .. माणूस आपल्या सोयीची बाजू पाहतो आणि दुसऱ्या बाजुकडं सोयीस्कररित्या दुर्लक्षही करतो. कोरोनाची एक बाजू ही काळीकुट्ट असली तरी दुसरी बाजूही नक्कीच विचारात घेण्याजोगी आहे. अचानक आलेल्या या संकटानं माणसांच्या जगण्यालाच कुलूप लावलं. मुक्त संचार करणारा माणूस घराघरात बंदिस्त झाला.  रस्ते सुनसान झाले आणि माणुसकीचा झराही आटला. माणसांच्या गावात राहूनही माणूस एकटा पडला. परस्परांच्या सुखदुःखात सहभागी होण्यावरही मर्यादा आल्या, माणसाचं माणसांत मिसळणंच बंद झालं !
 

कोरोनाच्या कालावधीत माणूस माणसांपासून दुरावला गेला पण कधी नव्हे तो आपल्या कुटुंबातही रमला ! पैशाच्या मागं धावता धावता कुटुंबासाठी वेळ देणं या धावत्या जगाला जमत नव्हतं, नाईलाजानं का होईना पण कुटुंब परस्परांच्या सहवासात राहू लागलं.. मुलांबाळाकडं ज्याला लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता तो दिवसभर मुलांशी खेळत राहिला. अवघं घर हसत खेळत राहिलं ! एरवी हे कधीतरी शक्य झालं असतं काय ? अर्थात या आनंदाला दुसरीही एक किनार चिकटली गेली. कोरोनाच्या काळात घरातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचीही आकडेवारी समोर आली. 
 

माणसांचे पाय थांबले, राबणारे हात थांबले तशी फिरणारी चाकंही थांबली होती, या चाकांबरोबर विकास थांबला पण पर्यावरण मात्र हसायला लागले. प्रचंड वाढलेलं प्रदूषण एकदम कमी झालं. कुठल्याही प्रयत्नानं जे घडणार नव्हतं ते या कोरोनामुळं घडलं ! हवेत रोज वारेमाप मिसळणारा कार्बन जिथल्या तिथं शांत बसला होता आणि प्रदूषित झालेली हवा शुद्ध झाली होती. ओझोनच्या पातळीत कधी नव्हे ती वाढ झाली.   जागतिक पातळीवर हे घडलं ! कदाचित यामुळंच गेल्या कित्येक वर्षात न पडलेला पाऊस कोसळत राहिला.
 

कोरोनानं स्वच्छतेचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. लहानपणापासून गुरुजींनी शाळेत स्वच्छतेचं महत्व शिकवलं पण माणूस हे कधीच शिकला नव्हता. कोरोनानं सतत हात धुवायला शिकवलं आणि रस्त्यावर पिचकाऱ्या मारणही थांबवलं.. आपलं आणि इतरांचं आरोग्य अबाधित ठेवण्याची जाणीवही या कोरोनानं करून दिली, अर्थात ज्याला कधीच सुधारायचं नाही त्याला कुणीच सुधारू शकत नाही हे सुद्धा या काळात पहायला मिळालं ! काटकसरीचा एक छान मंत्र या कोरोनानं शिकवला ! गरजा कमी असतानाही माणूस जगू शकतो याची जाणीव करून दिली. कोरोनामुळं सगळंच ठप्प झाल्यानं हातात जेमतेम पैसा होता पण त्यातही माणूस सुखानं जगू शकतो हे प्रत्येकाला समजून गेलं. 


अनावश्यक खर्चाला आपोआप मर्यादा आल्या आणि या खर्चाशिवाय जगता येतं याची जाणीव या कोरोनानं करून दिली. विशेषतः अत्यंत कमी खर्चात लग्नासारखे सोहळे होऊ शकतात हे या संकटानं दाखवून दिलं ! कर्ज काढून लग्न करायची आणि आयुष्यभर या कर्जाच्या जाळ्यात घुसमटत रहायचं...  दुर्दैवानं पुढं जाऊन आत्महत्या करायची ! अशी हजारो उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपण पाहिलेली असतात. कोरोनामुळं विवाहाच्या गर्दीवर मर्यादा आल्या आणि थाटमाटही कमी झाला. पर्यायाने लग्नसमारंभ 'हायफाय' करून कर्जात बुडण्यापासून कोरोनानं अनेकांना वाचवलंच ! कोरोना गुरुजींच्या शाळेत खूप काही शिकायला मिळालं हे मात्र नक्की ! चला ... आता तिसरी लाटही ओसरायला लागलीय म्हणतात ...
 

कोरोना आता परतीच्या प्रवासाला लागला आहे, तिसऱ्या लाटेच्या स्वरुपात तो पुन्हा येऊ नये यासाठी काळजी तर घेतलीच पाहिजे. कोरोनाच्या संकटानं जे नुकसान केलंय ते कधीही भरून न येणारं नक्कीच आहे, पण सुखाचा शोध घ्यायचा तर वाईटातून काही चांगलं निवडत समाधान तर करून घ्यावाच लागेल ! नाहीतरी करणार काय ?  एक मात्र नक्की, जीवनाचं मोल मात्र समजावून सांगितलं या कोरोनानं !  गीतकार  संतोष आनंद  म्हणतात, 

"कुछ खोकर पाना है, 
कुछ पा कर खोना है.. 
जीवन का मतलब तो, 
आना और जाना  है.." 

- अशोक गोडगे 
             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !