BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जाने, २०२२

विठ्ठलाच्या दारात राजकीय राडा ! खरे कोण, खोटे कोण ?



देवाच्या दारात घोषणांचे युद्ध !





पंढरपूर : एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यात विठ्ठलाच्या दारात राजकीय राडा झाला. देवाच्या दारात घातलेला हा गोंधळ पंढरीला मात्र आवडला नाही. 


मंदिराच्या पवित्र आणि प्रसन्न असलेल्या परिसरात आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमंगल गोंधळ झालेला पाहायला मिळाला. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यात मोठी बाचाबाची झाल्याचे अवघ्या पंढरीने पहिले. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या अंगावर तावातावाने धाऊन जाताना दिसत होते.  पोलिसांनी हस्तक्षेप करूनही हा राडा थांबायचं नाव घेत नव्हता. दोन्ही पक्षात अचानक संघर्ष सुरु झाला आणि दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील हा राडा पंढरपूरकर नागरिक आणि भाविक उघड्या डोळ्यांनी पाहत होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोजकेच होते त्यामुळे भाजपचे पदाधिकारी त्यांच्या अंगावर धावून जात होते आणि धक्काबुक्कीही करीत होते. 


नेहमीच वादग्रस्त चर्चेत राहणारे भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले हे विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते मंदिराकडे गेले आणि त्यानंतर हा वाद सुरु झाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी आले होते असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला तर राष्ट्रवादीने याचा इन्कार केला आहे. तुषार भोसले हे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत कसलीही माहिती न घेता बोलत असतात, त्यांना शरद पवार यांच्याबाबत माहिती मिळावी यासाठी आम्ही 'लोक माझे सांगाती' हे पुस्तक भेट द्यायला निघालो होतो. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंगावर धावून आले आणि धक्काबुक्की करू लागले, आम्हाला आंदोलन करायचे असते तर आम्ही आणखी कार्यकर्ते घेऊन आलो असतो   असे राष्ट्रवादी पदाधिकारी सांगत आहेत.    


टाळ मृदंगाचा निनाद आणि माउलीचा जयघोष ऐकायला मिळणाऱ्या मंदिर परिसरात आज दोन्ही बाजूनी दिल्या गेलेल्या घोषणाच ऐकायला मिळत होत्या. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे भलतेच आक्रमक मूढमध्ये पाहायला मिळत होते. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आणि ते देखील विठ्ठल मंदिराच्या परिसरात दिसलेल्या या चित्रावर पंढरपूरकरानी नापसंती व्यक्त केली आहे. मंदिर परिसर हा अलीकडे राजकीय आखाडा होत चाललेला आहे याबाबत यापूर्वीच अनेकांनी टीकाटिपण्णी केलेली आहे. 


आजच्या राड्यात भाजप म्हणते तसे खरोखरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भोसले यांच्या  अंगावर काळे टाकायला निघाले होते काय ? यातील सत्यही समोर येण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा खरोखरच असा प्रयत्न होता की केवळ भीतीपोटी भाजपने त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला ? हे देखील समोर येण्याची गरज आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विरोधकानाही शुभेच्छा दिल्या जातात पण आज अंगावर धावून जाणे, धक्काबुक्की करणे, घोषणाबाजी करणे असाच दुर्दैवी प्रकार देवाच्या दारात पाहायला  मिळाला. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात भाजप पदाधिकारी अधिकच आक्रमक झालेले दिसतात त्यातून जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ लावताना दिसत आहे.  दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजू मांडल्या असून यातील खरे कोण आणि खोटे कोण ? या प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक बनले आहे. काळे फासण्यासाठी कुणी येत असेल तर भाजपने प्रतिकार करणे, त्यांना रोखणे हे देखील तितकेच स्वाभाविक आहे. 


चंद्रकात पाटील म्हणाले-- 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. पोटनिवडणुकीतील पराभवामुळे आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कार्यकर्ते बाहेरच आलेले नाहीत. त्यामुळे तुषार भोसले यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रकार घडला आहे. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली आहे. सरकार संबंधितांवर कारवाई करणार आहे की त्यांना पाठीशीच घालणार आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.     

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !