BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२२

अखेर भैया देशमुख यांनी घेतली पोलीस अधिकाऱ्याचे 'विकेट' !

 


मंगळवेढा : जनहित शेतकरी संघटनेने अखेर मंगळवेढा येथील वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची विकेट घेतली असून गुंजवटे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 


मरवडे येथे दोन मुलीना विषबाधा झाली आणि या चिमुकल्या बहिणींचा याच विषबाधेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक झाली नव्हती. यामुळे जनहित शेतकरी संघटनेने रास्ता रोको सह अन्य आंदोलन सुरु ठेवले होते. आरोपींना पकडण्यात टाळाटाळ केली असा आरोप करून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर तथा भैया देशमुख यांनी पोलीस अधिकारी ज्योतिराम गुंजवटे यांच्या बदलीसह त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली होती. केवळ मागणी करून ते स्वस्थ बसले नव्हते तर सतत पाठपुरावा करीत होते. 


विषबाधा प्रकरणातील आरोपी पकडण्यात त्यांना यश आले पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले होते. आज अखेर पोलीस निरीक्षक गुंजवटे यांची बदली सोलापूर नियंत्रण कक्षात करण्यात आली आणि त्यांच्या जागी वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची नियुक्ती करण्यात आली.  पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चांगले काम केल्याचे सांगितले जाते पण विषबाधा प्रकरणी त्यांची आरोपींना अटक करण्यात अक्षम्य विलंब लावला होता. दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा या विषबाधेने बळी घेतला असल्याने जनभावना तीव्र होत्या आणि तेच आरोपी मोकाट राहिले होते. त्यामुळे जनतेचा संयम ढळत चाललेला असतानाच जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी हा विषय उचलून आणि लावून धरला होता. 


पोलीस निरीक्षक गुंजवटे हे त्या आधीदेखील काही प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. मंगळवेढ्यात झालेले दरोड्याचे दोन गुन्हे, दरोड्यातून झालेली हत्या याच्या तपासातही त्यांनी ढिलाई दाखवली होती. शिवाय एका पोलीस कर्मचाऱ्याला वाळू तस्कराने चिरडून मारले होते. यातून वाळू माफिया किती मोकाट सुटले आहेत हेच समोर आले होते. पोलिसाच्या लाचेचे प्रकरण, बोकडाची पार्टी अशा सगळ्याच गोष्टी चर्चेच्या आणि वादाच्या बनल्या होत्या. त्यातून पोलीस ठाण्याचा एकूण कारभारच वादग्रस्त बनून गेला होता. तालुक्यातील अवैध व्यवसायाचा विषय नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनांतही चर्चिला गेला होता. 


अशा प्रकारे सगळेच काही वादग्रस्त बनत होते आणि त्यातच जनहित शेतकरी संघटना आणि प्रभाकर देशमुख यांनी अत्यंत प्रभावीपणे पोलीस निरीक्षक यांच्या बदलीचा मुद्दा रेटला. रास्ता रोको आंदोलन केले आणि त्यानंतर अत्यंत कडाक्याची थंडी असताना आपल्या कार्यकर्त्यांसह ते थंडीत धरणे आंदोलनास बसले होते. अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करणारे देशमुख या प्रकरणात लक्ष घालू लागले तेंव्हाच या आंदोलनाचे फलित नक्की येणार हे दिसत होते. देशमुख यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याशी देखील संपर्क साधून पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. अखेर सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पोलीस निरीक्षक गुंजवटे यांची बदली केल्याचा आदेश काढला. या बदलीवर देखील देशमुख समाधानी नसून गुंजवटे यांची विभागीय चौकशी झालीच पाहिजे या मुद्द्यावर ते ठाम आहेत. गुंजवटे यांची बदली झाल्यानंतर मंगळवेढा तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले असून अखेर भैय्या देशमुख यांनी पोलीस निरीक्षक गुंजवटे यांची विकेट घेतलीच अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 


हे देखील वाचा : चमत्कार लसीचा ! मुका पुन्हा बोलू लागला !






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !