BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२२

पंढरीत चोरीचे सत्र सुरूच, कुलूप पाहून आणखी एक चोरी !

 



पंढरपूर : पंढरपूर शहरातील चोरीचे सत्र काही केल्या थांबायला तयार नसून पंढरपूर शहरात जुनी पेठ भागात पुन्हा एकदा चोरी झाली असून परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


पंढरपूर शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे प्रकार अमर्याद वाढलेले आहेत. सतत कुठल्या न कुठल्या भागात चोरी होण्याची घटना घडत आहे. पंढरपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून शहराच्या सगळ्याच बाजूनी उपनगरे वाढलेली आहेत. लोकवसाहत वाढत असली तरी त्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढताना दिसत नाही. चोरीच्या घटना आणि चोर यांच्यात मात्र मोठी वाढ होत आहे. भाविकांचे कपडे चोरण्यापासून घर फोडण्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या चोऱ्या खुलेआम होत असतात. काही घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात तर काही घटना केवळ चर्चेत राहतात आणि चर्चेतच संपतात. पंढरीत भाविकांची सतत ये जा असते, त्यांच्याही चोऱ्या होतात, घराच्या अंगणात लावलेल्या दुचाकी रातोरात गायब होतातच पण दवाखाने अथवा दुकानांच्या समोर उभ्या केलेल्या दुचाकीही विजेच्या चपळाईने चोरल्या जातात. बँकेत गेलेल्या नागरिकांचे अर्धे लक्ष बाहेर लावलेल्या गाडीकडे असते अशी कठीण परिस्थिती पंढरपूर शहरात निर्माण झालेली असतानाच पुन्हा एकदा जुनी पेठ भागात चोरी झाल्याची घटना घडली आहे. 


घराला कुलूप दिसले की चोराला खुले आमंत्रण वाटू लागले आहे. बंद घरावर नजर ठेवून त्या घरात हमखास चोरी होत आहे. अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना अधिक होत असल्याने नागरिकांनीही आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची अधिक गरज निर्माण झाली आहे. जुनी पेठ येथील समीर बागवान यांच्या घराला लागले कुलूप पाहून ६५ हजाराची चोरी करण्यात आली आहे. बागवान हे घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परगावी गेले होते, हीच संधी चोरट्यांनी साधली.  दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते परगावी गेले आणि  दुसऱ्या दिवशी सकाळी या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बागवान हे तर परगावी गेले आहेत आणि त्यांच्या घराचा दरवाजा उघडा आहे हे त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले आणि हा प्रकार नातेवाईकांनी सकाळी बागवान यांना कळवला. 


आपल्या घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच बागवान तातडीने पंढरीत आले आणि त्यांनी घराची पाहणी केली. घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचेही त्यांनी दिसले. घरातील दागिन्यांची चोरी झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले. साडे बारा हजार रुपये किमतीची सोन्याची अर्धा तोळ्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, २२ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ असा ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी या चोरीबाबत पंढरपूर शहर पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी या चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 


पंढरपूर शहरातील जुनी पेठ हा तसा गजबजलेला परिसर असून या भागात झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुलूपबंद घरे पाहून चोर हात साफ करीत असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना घराच्या सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे बनू लागले आहे. 

             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !