BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२२

कुत्र्याने लावले पंढरपूर पोलिसांना 'कामाला' !

 



पंढरपूर : कुत्र्याने जमीन उकरली आणि बाहेर आला साडीचा पदर, लोकांनी पहिले आणि आला भलताच संशय ! या संशयातून बातमी पोहोचली पंढरपूर पोलिसांपर्यंत आणि मग सगळीच यंत्रणा धावत सुटली पण --


संशय आणि शंका हा महाभयानक राक्षस आहे, तो कधी काय करील हे सांगता येत नाही. अशाच एका शंकेतून सरकारी यंत्रणा अकारण 'कामाला' लागली आणि शेवटी 'डोंगर पोखरून उंदीर निघाला' अशी वेळ आली. नंतर मात्र हसावं की रडावं अशी अनेकांची अवस्था झाली पण मिळालेल्या बातमीनुसार चौकशी करणे तर आवश्यक असतेच ! पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावाजवळच्या गोसावी वाडी येथे हा वेगळाच प्रकार समोर आला आहे. गोसावीवाडी परिसरातील पडीक पडलेल्या शेतात झाडे झुडुपे वाढलेली आहेत. या झुडुपात मोकाट कुत्री मोकाटच फिरत होती. फिरता फिरता कुत्र्याने जमीन उकरली आणि त्यातून साडीच्या पदराचा तुकडा देखील बाहेर आला आणि तेथूनच या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली. 


कुत्र्याने उकरलेल्या खड्ड्यातून साडीचा पदर बाहेर आला आणि तो काही नागरिकांना दिसला. जमिनीतून साडीचा पदर बाहेर आला म्हणजे कुणीतरी येथे महिलेचा मृतदेह पुरलेला आहे अशी काही नागरिकांची खात्रीच झाली. स्मशानभूमीचा परिसर नाही आणि  साडीचा पदर बाहेर आला म्हणजे काही तरी मोठी  भानगड यातून बाहेर येणार असा कयास लावला गेला. महिलेचा खून करून गुपचूपपणे तिचा मृतदेह घाईगडबडीने जमिनीत पुरला गेला असल्याचा संशय बळावला गेला आणि ही बातमी पंढरपूर तालुका पोलिसांपर्यंत पोहोचवली गेली. दरम्यान परिसरात याची माहिती गेली आणि ज्याची त्याची चर्चा सुरु झाली. प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार यावर बोलू लागला. 


पोलिसांना ही माहिती मिळाल्याने त्यांनी लगेच हालचाली सुरु केल्या. मिळालेल्या माहितीवरून काही तरी मोठा गुन्हा घडला  आहे असे पोलिसांना वाटणे स्वाभाविकच आहे. पोलिसांनी लगेच कायद्याप्रमाणे तहसीलदार यांना ही माहिती कळवली. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, निवासी नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यासह काही अधिकारी आणि कर्मचारी हे जय्यत तयारीनेच तुंगत परिसरातील गोसावीवाडीच्या पडीक शेतातील झाडीझुडूपात पोहोचले. एव्हाना तुंगत परिसरात वाऱ्याच्या वेगाने ही बातमी पोहोचली होती आणि अनेकजण या ठिकाणी जमा झालेले होते. 


पडीक जमिनीत कुणाचा मृतदेह पुरला असेल ? कुठल्या महिलेचा खून झाला असेल ? परिसरातील कुठल्या गावातील महिला बेपत्ता आहे काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात जो तो मग्न होता आणि धीरगंभीरपणे सरकारी यंत्रणेच्या हालचालीकडे पाहत होता. पोलीस आता कुणाचा मृतदेह बाहेर काढताहेत याची उत्सुकता ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर होती. पोलिसांनी वेळ न दवडता खोदायला सुरुवात केली आणि थोडसंच खोदल्यावर सागांचेच चेहरे अर्धमेले होऊन गेले. सरकरी यंत्रणा एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिली. जमीन थोडीशी उकरल्यानंतर एक मृतदेह दिसून आला पण तो कुठल्या महिलेचा नव्हता तर तो एका कुत्र्याचा होता. कुणीतरी आपले पाळीव कुत्रे मयत झाल्यानंतर साडीत गुंडाळून त्याचा मृतदेह येथे पुरलेला होता. 


वाचा : >> पंढरीत पुन्हा घर फोडले !


'खोदा पहाड, निकला कुत्ता' अशी अवस्था सरकारी यंत्रणेची झाली. एक कुत्र्याने अवघी सरकारी यंत्रणा कामाला लावली. तरी देखील काही अनुचित प्रकार समोर न आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि मोठ्या कुतूहलाने पाहायला आलेली गर्दी गपगुमान आपल्या घराकडे जाऊ लागली. एका कुत्र्याने जमीन उकरली आणि पंढरपूर तालुका पोलीसाना मोठी धावपळ करावी लागली. जमिनीत कुत्र्याचा मृतदेह असल्याचे पाहून बघ्यांचे चेहरे मात्र बघण्यासारखेच झाले होते.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !