पंढरपूर : लहान मुलीला धक्का लागल्याच्या रागातून एक मोटार सायकल पेट्रोल ओतून पेटवून देण्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरात घडली असल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
पंढरपूर शहरातील वाहतूक प्रचंड विस्कळीत असते आणि वाहतुकीचे कसलेही नियम पाळले जात नाहीत. बेफिकीरपणे वाहने चालविली जात असतानाच रस्त्यावरून मुक्त संचार करीत असलेलील जनावरे तसेच अस्त्याव्यस्त चालणारे पादचारी यामुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रसंग शहरात नेहमीच येत असतात. असाच एक प्रकार भजनदास चौकात घडला आणि मुलीला धक्का लागल्याच्या रागातून दोघांनी पेट्रोल टाकून मोटार सायकल जाळून टाकल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे. याबाबत राजपूत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार खिस्ते गल्लीत राहणारा रोहीतासिंग दत्तूसिंग राजपूत हा तरुण मोटार सायकलवरून ( एम एच १२ क्यू एस ९४०६) नाथ चौकातून खिस्ते गल्लीकडे जात असताना भजनदास चौकात आल्यावर त्याच्या गाडीने एका लहान मुलीला धडक दिली. लहान मुलगी अचानक रस्त्यात आल्याने राजपूत याच्या दुचाकीने मुलाला धडक लागली आणि ती रस्त्यावर खाली पडली. आपल्या दुचाकीच्या धडकेने लहान मुलगी जखमी झाल्याने रजपूत घाबरला आणि त्याने तेथून पळ काढला. अत्यंत वेगाने तो तेथून सटकला आणि जुन्या अरुण थियेटरच्या मागच्या बाजूस जाऊन त्याने गाडी उभी केली आणि बाजूला सहकार तालीम येथे जाऊन अंधारात थांबला. त्यावेळेस समाधान अधटराव ) हरिदास वेस) आणि ओंकार हुग्गे (गोविंदपुरा) यांनी व अन्य काही जणांनी दगड मारून त्याच्या दुचाकीचे नुकसान केले.
मुलीला धडक लागल्याने आणि राजपूत तेथून पळून गेल्याने काही लोक संतापलेले होते. या संतापाच्या भरात लोक आपल्याला मारतील अशी भीती राजपूत याला वाटली आणि त्यामुळे तो तेथूनही पळून गेला. लोकांच्या माराच्या भीतीने तो प्रथम सांगोला येथे गेला आणि नंतर त्याने सोलापूर गाठले. पुन्हा तो पंढरपूर येथे आला असता त्याची उभी मोटार सायकल जाळून टाकली असल्याची माहिती त्याच्या एका मित्राने त्याला दिली. सदर दुचाकी पेट्रोल टाकून जाळण्यात आली असल्याची माहितीही त्याच्या मित्राने त्याला दिली. त्यानुसार रजपूत याने समाधान अधटराव आणि ओमकार हुग्गे तसेच अन्य काही जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हे देखील वाचा : > पोलिसानेच दिली पोलिसाच्या खुनाची 'सुपारी' !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !