सोलापूर : कोरोनामुळे अवघे शिक्षणच गुदमरून गेलेले असताना आता सोलापूर जिल्ह्यातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या पूर्व परीक्षांच्या तारखांचे नियोजन करण्यात आले असून १ ते १० फेब्रुवारी दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
कोरोनाने जसे सगळेच नुकसान केले तसे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान केलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणाची दारे अर्धवट उघडी आहेत आणि सलग दोन वर्षे विद्यार्थी शैक्षणिक नुकसान सहन करीत आहेत. यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा तर मोठा कोंडमारा झालेला आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला तोंड देण्यापूर्वी सराव परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्ध्याना आपल्या गुणवत्तेचा अंदाज येण्यासाठी या परीक्षा अत्यंत महत्वाच्या असतात. मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून दरवर्षी या परीक्षा होत असतात. यावेळी जवळपास सर्वच शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, कोरोनामुळे शाळा महाविद्यालये प्रचंड विलंबाने सुरु झाली त्यामुळे शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी आल्या. यावर्षी दहावी आणि बारावीच्या पूर्व परीक्षा १ ते १० फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात सुमारे १२५ कनिष्ठ महाविद्यालये आणि ६७५ माध्यमिक शाळा या मुख्याध्यापक संघाच्या सभासद आहेत. मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून पाचवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा आणि पूर्व परीक्षा घेण्यात येतात. साधारणपणे दरवर्षी १ जानेवारी पासून सराव परीक्षा घेतली जाते पण यावर्षी कोरोनामुळे अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही, ऑनलाईन शिक्षणातही सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता आले नाही त्यामुळे त्यांचाही अभ्यास होऊ शकला नाही त्यामुळे मुख्याध्यापक संघाच्या परीक्षांचे नियोजन पुढे ढकलले गेले आणि आता या परीक्षा १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची दुसरी चाचणी परीक्षा देखील घेतली जाणार आहे. कोरोनाची तिसरी लाट भीती दाखवत असताना आणि रोज नवनवे निर्बंध लागू होत असताना भविष्यातील पर्रीक्षांचे काय होतेय याचीही भीती कायम आहे.
या परीक्षांचे नियोजन हे शाळेनुसार असते, ज्या शाळा मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिका वापरतात त्यांच्यापुरतेच ते मर्यादित असते, शिवाय रयत शिक्षण संस्था आणि अन्य काही संस्था आपल्या स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करीत असतात आणि त्यानुसार परीक्षेचे आयोजन करीत असतात.
वाचा > क्लिक करा >> पंढरीत मुलीला धक्का लागला म्हणून पेट्रोल टाकून जाळली दुचाकी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !