पुणे : पोलिसानेच आपल्या सहकारी पोलिसाचा खून करण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हेगारावर वचक निर्माण करून गुन्हेगारी रोखणे आणि त्यांना केलेल्या गुन्ह्याची शिक्षा न्यायालयातून मिळवून देणे हे काम पोलिसांनी करायचे असते पण पोलिसात देखील गुन्हेगार असल्याचे अनेक घटनातून समोर आले आहे. काही पोलीस मात्र आपल्या वर्दीशी सतत बेईमान झालेले असतात परंतु त्यांना कधी ना कधी याची शिक्षाही भोगावी लागतेच. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी गुन्हा करताना काहीतरी पुरावा मागे सोडून जातो आणि अडकतो. या घटनेतही असाच प्रकार घडला आणि दुसऱ्या प्रकरणाचा शोध घेताना ही धक्कादायक माहिती समोर आली आणि सुपारी देणाऱ्या पोलिसाचे भांडे फुटले.
पुणे येथील दत्तवाडी पोलिसांनी एक मोठा कट उघडकीस आणला आहे. पोलिसाने चक्क एका सराईत गुन्हेगाराला दहा लाखाची सुपारी देऊन दुसऱ्या एका पोलिसाचा काटा काढण्यास सांगितले होते. पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला दुसरा पोलीस कर्मचारी दिनेश दोरगे याचा काटा काढण्याचे नियोजन केले होते. दोघेही परस्परांच्या शेजारी राहत होते परंतु त्यांच्या टोकाचे वाद झाले होते. यातूनच दुधाळ याने योगेश अडसूळ या एका सराईत गुन्हेगाराला सुपारी दिली होती.
हा प्रकार कुणाच्याही लक्षात येणार नाही असा सुपारी देणाऱ्या पोलिसाला विश्वास होता पण सत्य आपोआपच बाहेर आले. सराईत गुन्हेगार योगेश अडसूळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एका प्रकरणात तो गजाआड होता. नुकताच तो पॅरोलवर बाहेर आला होता. सराईत गुन्हेगाराच्या झाडाझडतीच्या दरम्यान त्याचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आणि पोलिसांना काही संशयास्पद आढळून आले. पोलिसांना शंका येताच अडसूळ याला ताब्यात घेतले आणि त्याच्या मोबाईलची पडताळणी करण्यात आली. यावेळी काही संशयास्पद रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसांच्या खुनाची सुपारी दिली असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
पोलीस कर्मचारी दुधाळ याने दोरगे यांचा काटा काढण्यासाठी दहा लाखाची सुपारी दिली होती . पोलीस कर्मचारी दोरगे यांचा अपघात घडवून हे सगळे काही करायचे होते आणि त्यानंतर पुढे जे काही होईल ते दुधाळ सांभाळणार होता. असे सगळे नियोजन करण्यात आले होते आणि ही बाब पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही माहिती उघड होताच पोलीस देखील चक्रावून गेले. या प्रकरणी सराईत गुन्हेगार योगेश प्रल्हाद अडसूळ याला अटक करण्यात आली असून सुपारी देण्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एक पोलीस दुसऱ्या पोलिसांच्या हत्येची सुपारी देतो याने पोलीस दलालाही धक्का बसला असून त्या परिसरात ही बातमी पसरताच एकाच खळबळ उडाली आहे. सहज झडतीत पोलिसांच्या हाती गुन्हेगाराचा मोबाईल लागला म्हणून एक मोठा कट उघडकीस आला अन्यथा ही सुपारी 'वाजली' असती तर एका पोलिसांचा जीव गेला असता. एका पोलिसांकडून एवढे मोठे कांड करण्यात आले याचे पोलिसांना देखील आश्चर्य वाटत असून धक्काही बसला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !