BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ जाने, २०२२

हा 'D' कोण ? सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकच चर्चा !

 




पंढरपूर : 'हॅलो, मी 'D' बोलतोय ! भाजपच्या विरोधात मतदान करायचे आहे. हे लक्षात ठेवा !' असं निक्षून सांगणारा हा D कोण ? हाच प्रश्न सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला आणि सामान्य माणसाला देखील आता पडलेला आहे. 


राजकारणात कधी कुठल्या विषयाला महत्व येईल आणि कधी कशाची चर्चा महत्वाची ठरेल हे कधीच सांगता येत नाही.  आता हेच पहा ना, सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणूक नुकत्याच झाल्या आणि निकालही घोषित झाला. या निकालाने काहींचे निकालच लावले तर काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. आता निवडणूक म्हटलं की हे चालायचंच म्हणा ! निवडणूक झाली की काही दिवस पुन्हा चर्चेचे चर्वण सुरूच राहते. आपण कसे निवडून आलो याचे रसभरीत वर्णन उमेदवार करू लागतात तर 'आपण आपल्या उमेदवाराला कसे निवडून आणले' इथपासून 'आपण नसतो तर हे सीट येतच नव्हते' इथपर्यंत बढाया मारणारे कार्यकर्ते  चौकाचौकात हमखास भेट असतात. निवडणूक कुठलीही असो, निकालानंतर हे कवित्व उरर असतेच ! पण नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीची निवडणूक वेगळ्याच कारणांनी चर्चिली जाऊ लागली आहे. 


माळशिरस तालुक्यातील महाळुंग- श्रीपूर ही नगरपंचायत. अकलूजच्या शिवारातलीच म्हणा ना ! आता अकलूज म्हटलं की मोहिते पाटील हे काही वेगळं सांगायला नको ! इथल्या राजकरणावर विजयदादांचा दबदबा.. शिवाय रणजितदादाही आहेतच. पण राजकारणात दोन्ही सिंह सद्या 'कमळ' बागेत रमलेले. त्यामुळे महाळुंग- श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हा आरामात भाजपच्या बाजूला जाणार असं वाटणारच ! स्थानिक पातळीवर असो नसो, पण जिल्ह्यात तर तसे आडाखे बांधले जाणारच ! पण निकाल लागला तेंव्हा या अंदाजाचाही निकालच लागला ! इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तब्बल सहा जागा मिळाल्या आणि भाजपच्या वाट्याला अवघी एक जागा आली. आता असा निकाल म्हटल्यावर भाजपच्या जिव्हारी लागणारच की हो !


निकाल लागला, निवडणुकीची चर्चा झाली, बरेच काही बाही झाले पण एका गोष्टीची चर्चा जिल्हाभर सुरु झाली. नुसती चर्चाच नाही तर तर उत्सुकताही ताणली गेलीय, हा 'D' कोण ? अहो ते दाऊद गॅंगला नाही का 'डी' म्हणत ! पण महाळुंग श्रीपूरशी दाऊदचा काय संबंध ? नाहीच ना ! पण महाळुंग श्रीपूरमध्ये झळकलेले फ्लेक्स ही काय भानगड आहे ? हीच तर चर्चा जिल्हाभर सुरु आहे ना ! महाळुंग- श्रीपूर येथे जागोजागी पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. त्यावर लिहिलंय,  'हॅलो, मी 'D' बोलतोय ! भाजपच्या विरोधात मतदान करायचे आहे. हे लक्षात ठेवा !' त्यामुळं आता हा डी कोण ? असाच प्रश्न ज्याला त्याला पडलाय ! साहजिकही आहे ना ! आधीच अंतर्गत गटबाजीचा काटा बोचतोय आणि त्यात हे फलक ! 


आता हा 'डी' कोण असा प्रश्न कुणालाही पडणार यात काही शंका नाहीच म्हणा, पण भाजपला गोंधळात टाकण्यात मात्र तो नक्कीच यशस्वी झालाय हे मात्र खरं! आता हा राजकारणातला आहे की बाहेरचा ? कुणास ठाऊक ! पण हा भाजपचा मात्र पक्का वैरी दिसतोय हे मात्र खरं. त्याचा राग भाजपवर आहे की स्थानिक नेते मंडळीवर ? खर तर हा भेटला की त्यालाच विचारायला हवं ! पण हा भेटणार तरी कधी आणि कुणाला ! एका प्रश्नातून दुसरे प्रश्न निर्माण व्हायला लागले. दोन ओळीत मात्र या 'डी' ने  अख्ख्या  सोलापूर जिल्ह्याला कामाला लावलं हे मात्र खरं ! भाजप तरी या पराक्रमी पुरुषाचा शोध घेतेय की नाही कुणास ठाऊक !


काय असेल ते असेल बुवा ! पण एवढं काही दिसल्यावर आणि ते देखील अकलूजच्या राजकारणात..... म्हणून तर जिल्हा एकमेकांना विचारतोय, 'काय हो , काही कळलं का हा 'D' कोण?' एवढे फलक लावलेत म्हटल्यावर हा कुणी साधासुधा तर नसणारच, पण तरीही जिल्ह्याच्या राजकारणात याचीच चर्चा आणि उत्सुकता ! आज नाही कळलं तरी उद्या परवा कळणारच आहे की! राजकारणात कधी काही फार काळ दडून राहिलंय का? नाही विचारलं तरी, नाही चौकशी केली तरी आपोआप बाहेर येतच की ! तसं हे पण आज न उद्या समजणारच आहे. पण तोपर्यंत दम निघाला तर मग राजकारण कसलं ? पण या भागात मात्र पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आणि सामान्य जणांची करमणूक मात्र नक्की झाली. गप्पा टप्पा करायला विषय मिळाला ना राव ! नाहीतरी आता निवडणूक झाल्यावर गप्पा छाटायला विषय पाहिजेच होता की !       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !