BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जाने, २०२२

सोलापूरसह बारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ !



 सावधान ! संकट पुनः परत येतेय !

s


सोलापूर : देशात आणि महाराष्ट्रात कोरोना पुन्हा सुसाट सुटला असून राज्यातील बारा जिल्यात अधिक रुग्णवाढ होत असून यात सोलापूर जिल्हयाचा समावेश आहे.  या बारा जिल्हयावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


कोरोनाने पुन्हा एकदा जगभरची झोप उडवली असून भारतातही प्रभाव वाढू लागला आहे. देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण अत्यंत वेगाने वाढू लागले आहेत. गेल्या दहा दिवसात राज्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण १८ हजारांनी तर ओमीक्रॉन चे रुग्ण ३८९ ने वाढलेले आहेत. ओमीक्रॉनचे रुग्ण वाढत असले तरी सुदैवाने अजून यापैकी एकालाही ऑक्सिजनची आवश्यकता पडलेली नाही पण रुग्ण वाढत असलेल्या बारा जिल्ह्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या बारा जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. 


कोरोनाची सुरुवात झाल्यापासून कोरोना रुग्णवाढीत सोलापूर जिल्हा सतत पुढे होता आणि सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले आहेत तसेच मृत्यही पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक झाले आहेत.  रुग्णवाढ अधिक असलेल्या बारा जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे,पालघर, रायगड, पुणे, सातारा,  नगर, नाशिक, सांगली, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने या बारा जिल्हयावर अधिक लक्ष केंद्रित केले असून ही रुग्णवाढ अशीच सुरु राहिल्यास या ठिकाणचे निर्बंध आणखी कडक करण्यात येतील असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.  

 

बारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असताना यातील काही जिल्ह्यातील २० टक्के नागरी अजूनही लस घेण्यापासून दूर आहेत. लस न घेतलेल्या व्यक्ती कोरोनाचे वाहक ठरू नयेत यासाठी अत्यंत बारकाईने नियोजन केले जात आहे. रुग्ण वाढू लागले तर आणखी कडक निर्बंध लागू करावेच लागतील पण पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.  कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज असून रुग्णालये सज्ज करण्यात येत आहेत. पुरेसे डॉक्टर, औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, पीपीई संच, चाचणी संच, खाटा या सगळ्यांची पुरेशी उपलब्धता आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 


रुग्ण वाढत असताना निर्बध आवश्यक ठरतात, गर्दीमुळे कोरोना, ओमीक्रॉनचा संसर्ग वाढण्याचा अधिक धोका असतो त्यामुळे गर्दीच्या कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले आहेत पण कोरोना रुग्णांत अधिक वाढ होताना दिसून आल्यास अशा कार्यक्रमावर पूर्ण बंदी घालण्यात येईल. लॉकडाऊन सरसकट करण्याचे नियोजन नाही पण पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यातील रुग्ण वाढतील त्या ठिकाणी मात्र निर्बंध आणखी कडक केले जातील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तिसरी लाट सुरु झाली तरी अनेकजण कोरोनाच्या नियमांपासून दूर आहेत आणि अत्यंत बेफिकीर वर्तन करीत असल्याचे दिसत आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याचे शासन सांगत असताना सगळीकडेच गर्दी दिसत असून कोरोनाचे भय उरले नसल्याचेच चित्र प्रहायला मिळत आहे. त्यात नाताळ आणि नववर्ष या निमित्ताने अनेक ठिकाणी गर्दी होर राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरीत भाविकांचाही गर्दी होताना पाहायला मिळत आहे. ही गर्दी नक्कीच धोकादायक ठरण्याची भीती आहे. 


अमेरिकेत स्फोट !

भारतात तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली आहे पण भारताच्या आधी इतर देशात कोरोनाने हहा:कार उडवून दिला आहे. तेथील परिस्थितीत विचारात घेऊन भारतीय नागरिकांनी आचरण करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेत कोरोनाचे एकाच दिवसात ५ लाख ८० हजार रुग्ण आढळले आहेत. फ्रान्समध्ये तर दरारोज २ लाख रुग्ण सापडत आहेत. ब्रिटनमध्ये  एका दिवसात  १ लाख ८९ हजार १२३ तर स्पेनमध्ये दररोज एक लाखपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. भारतातही अशी परिस्थिती येण्याचा धोका काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे हे संकट मागच्यापेक्षा अधिक गडद होण्याची भीती आहे.    



तिसरी लाट सुरु !

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तिसरी लाट सुरु झाल्याचे सांगितले आहे. मुंबई, दिल्लीच्या काही भागात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असल्याचे टास्क फोर्स सदस्यांनी देखील म्हटले आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले आहे. तिसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा असून लॉकडाऊन लागले तर मुंबई लोकल आणि शाळा तसेच अन्य सेवाबाबत निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रात सद्या लॉकडाऊनची स्थिती येत आहे, कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग वाढला असून तिसरी लाट आली आहे त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, लॉकडाऊनचे वेळ आलीच तर रेल्वेसह अन्य सेवांच्या बाबतीत निर्णय घ्यावाच लागणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 


कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा संसर्गही वाढू लागला आहे, खबरदारी म्हणूनच विविध सार्वजनिक कार्यक्रम, सभा, समारंभ यावर निर्बंध आणले गेले असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !