मुंबई : कोरोनाची तिसरी लाट सुरु असताना राज्य शासनाने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे पण अशा वेळी मुलांना शाळेत पाठवायचे की नको याबाबत महाराष्ट्र 'आयएमए' चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात शाळा उघडू शकल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहेच. ऑनलाईन शिक्षण सुरु राहिले तरी ते घेणे सर्वाना शक्य झाले नाही शिवाय घरात बसून लहान मुले एकलकोंडी होताना दिसत आहेत. मुलांना शाळेत जाता येत नसेल तर त्यांच्या भवितव्याचे काय ? असा प्रश्न पालकांपुढे पडलेला आहे. शाळा सुरु करण्यात यावी अशी मागणी होत असताना कोरोनाच्या काळात शाळा सुरु करण्यात येऊ नये असे म्हणणाराही एक वर्ग आहे. शासनानेही थेट शाळा सुरु करण्याचे आदेश दिलेले नाहीत. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे पण स्थानिक प्रशासनाने स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचेही सांगितले गेले आहे. अशा परिस्थितीत पालकांची अवस्थाही दोलायमान झाली आहे.
राज्य शासनाने शाळा सुरु करण्यास मान्यता दिली असली तरी शाळेत येण्यास मुलांना सक्ती करण्यात आलेली नाही. पालकांनी समती दिलेले विद्यार्थीच शाळेत येतील असे शिक्षणमंत्री यांनी म्हटले आहे. गेल्या १९ दिवसांच्या कालावधीत १ ते १० वर्षापर्यंतच्या १७ हजार ५३३ मुलांना कोरोनाची बाधा झालेली आहे. या परिस्थितीत पालकांचाही गोधळ उडाला आहे. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे पण लगेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या मुलांचे पूर्ण लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरु करणे धोक्याचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. पण महाराष्ट्र आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी मुलांना सद्यस्थितीत शाळेत पाठवणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
मुलांचे लसीकरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना शाळेत पाठवणे योग्य होणार नाही. कारण मुलांना कोरोनाचा संसर्ग आणि गंभीर इन्फेक्शन होऊ शकते. शिवाय मुलं घरी गेल्यानंतर घरातील वयस्कर तसेच अन्य व्यक्तीनाही बाधित करू शकतात. त्यांच्यामुळे घरातील अन्य व्यक्तीनाही कोरोनाची बाधा होऊ शकते त्यामुळे मुलांचे लसीकरण करावे आणि मगच शाळा सुरु करण्याच्या सूचना सरकारने द्यायला हव्यात असे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगतिले. शासनाने शाळा सुरु करण्याची घोषणा केलेलीच आहे. अशा वेळी मुलांना जर शाळेत पाठवायाचेच असेल तर पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांचे लसीकरण करावे तसेच १४ वर्षाच्या वयाच्या आतील मुलांना इन्फ़्लुएन्झाचे इंजेक्शन देण्यात यावे. शाळेत जाणाऱ्या मुलांना अतिरिक्त मास्क दिले जावेत तसेच कोरोनाच्या नियमांची माहिती मुलांना देण्यात यावी. मुले शाळेतून घरी आल्यानंतर हातपाय धुणे, कपडे बदलाने आदी स्वच्छतेची सवय त्यांना लावावी अशा सूचनाही डॉ. भोंडवे यांनी केल्या आहेत.
हे वाचा >> कुत्र्याने लावले पंढरपूर पोलिसांना 'कामाला' !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !