BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२२

एका दूधवाल्याने पळवले सहा दरोडेखोर !

 



वाशीम :हल्ली चोर दरोडेखोरांचे मनोधैर्य एवढे वाढले आहे की त्यांना पोलिसांचीही भीती वाटत नाही पण एका दुधावाल्यामुळे सहा दरोडेखोर पळून गेल्याची घटना घडली आहे. 


अलीकडे चोर इतके निर्ढावलेले आहेत की चोरी करणे हा आपला हक्कच आहे अशा थाटात ते चोरी  करीत असतात. पोलीस म्हटलं की चोरांच्या अंगावर काटा उभा रहायचा पण हल्ली तेही होताना दिसत नाही. पण वाशीम शहरातील लाखाळा परिसरातील माधवनगर येथील एका व्यापाऱ्याच्या घरावरील दरोड्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आणि दुधविक्रेत्याने व्यापाऱ्याची मोठी मालमत्ता वाचवली आहे. अडत व्यापारी किशन देवानी यांच्या घरी पाच ते सहा दरोडेखोर आले. लाखाळा परिसरामधील माधवनगर येथे किशन देवांनी यांचे कुटुंब राहते. किशन आणि त्यांचे वडील कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत व्यापारी आहेत. हे दोघेही सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी दरोडेखोर घुसले. साधारण ३० ते ४० वयोगटातील सहा व्यक्ती दरोडा टाकण्यासाठी देवानी यांच्या घरात घुसले आणि घरातील महिलांना शस्त्रांचा धाक दाखवू लागले. 


अचानक घडलेला हा प्रकार पाहून घरातील महिला चक्रावून आणि प्रचंड घाबरून गेल्या. किशन देवानी आणि त्यांचे वडील तर कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या आडत व्यापाराचे काम पाहत होते. घरी काय संकट आलेय याची त्यांना जाणीवही नव्हती. एकदम सहा दरोडेखोर घरात घुसले असल्याने आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे महिलांना शांतपणे उघड्या डोळ्यांनी दरोडा पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. हा सगळा प्रकार पाहून घरातील महिलांचा आरडओरडा सुरु होता आणि दरोडेखोर धमकावून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते एवढ्यात बाहेर दूधवाला आला होता. या दुधवाल्याने आतील काही आव्वाज ऐकला आणि आत काहीतरी वेगळे घडतेय याची त्याला जाणीव झाली. या दूधवाल्याने शेजाऱ्यांना हाक मारायला सुरुवात केली आणि त्याच क्षणी दरोडेखोर घाबरले. काहीही न करता तेथून पळून जाण्याशिवाय आता त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. दुधवाल्याचा आवाज कानावर पडताच सर्व दरोडेखोरांनी तेथून धूम ठोकली आणि एक मोठा दरोडा पडता पडता वाचला.       


कर्ज झाले म्हणून --

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दरोडेखोरांना २४ तासांच्या आत जेरबंद केले आणि दरोड्याचे कारण समोर आले. यातील एक आरोपी पुंजाजी इढोळे याच्याकडे वाळूचे दोन टिप्पर आहेत. या दोन टिप्परवर आणि शेतीवर शेतीवर ९० लाखांचे कर्ज झाले म्हणून ते फेडण्यासाठी दरोडा टाकण्याचे नियोजन करण्यात आले पण ते ही फसले. कर्जाचे मोठे ओझे होते आणि ते फेडण्यासाठी त्यांचाजवळ काही पर्याय नव्हता. अखेर त्याच्या डोक्यात दरोड्याची कल्पना आली आणि त्यानुसार त्याने नियोजन सुरु केले. पुंजाजी याने आपल्या साथीदारासह एका धाब्यावर बसून नियोजन करून दरोड्याचा कट आखला. देवानी यांच्या घरावर दरोडा टाकला तर एक ते दोन कोटी रुपये सहज मिळतील असा अंदाज बांधून त्यांनी देवानी यांच्या घरावर पाळत ठेवली होती. पाळत ठेवत आणि सगळी माहिती जमा करीत  हा दरोडा टाकण्यासाठी घरात घुसले.  


दरोड्याचा हा प्रकार होताच पोलीस सतर्क झाले आणि २४ तासांच्या आत या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आणि अंजनखेडा  येथील काशीराम पायाघन, लखन उर्फ इश्वर रामभाऊ पायाघन, दोडकी येथील पुंजाजी किसान इढोळे यांना संशयावरून आणि मिळालेल्या माहितीवरून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपला इंगा दाखवायला सुरुवात करताच त्यांनी गुन्हा देखील कबूल केला. टिप्पर आणि शेतीवर झालेल्या कर्जामुळे तणावात होतो, सदरचे कर्ज फेडण्यासाठी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे या आरोपींनी सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !