BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२२

पंढरीत बँकेत बनावट सह्या करून लाखोंची फसवणूक !

 



पंढरपूर : बनावट सह्या करून आपल्याच कर्मचाऱ्याच्या नावाने कर्ज उचलून लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तो अकरा वर्षांनी उघडकीस आला आहे. 


शेतकऱ्याच्या नावे परस्पर कर्ज उचलून त्याची बनावट सही करण्याचे प्रकार आजवर अनेक बँकेत घडले आहेत. अन्य कामासाठी दिलेल्या कागदपत्रांचा वापर करून बँकेशी संबंधित असलेले भामटे असे कर्ज उचलतात. आपल्या नावावर लाखोंचे कर्ज आहे हे त्या शेतकऱ्याला माहीतही नसते पण जेंव्हा वसुलीची नोटीस येते तेंव्हा त्याची झोप उडते आणि मग तो सैरावैरा पळत सुटतो. ज्याने रुपयाचे कर्ज घेतले नाही त्याच्या मागे बँक लागते आणि कर्जाची रक्कम व्याजासह भरण्याचा तगादा लावते. अशी अनेक प्रकरणे घडली असून ती न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. अकरा वर्षांनी उघडकीस आलेले हे प्रकरण मात्र शेतकऱ्यांशी संबंधित नसून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याचे आहे. 


राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या सह्या करून राज्य परिवहन सहकारी बँकेतून परस्पर कर्ज काढून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे यामुळे परिवहन कर्मचारी हादरले आहेत आणि आपल्याही नावावर असा काही प्रकार झाला नसेल ना ? अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेले सांगोला येथील कर्मचारी अशोक बालक पवार यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसात दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. 


सांगोला येथील अशोक पवार हे राज्य परिवहन महामंडळात सेवेत होते आणि या सेवेतून ते निवृत्त झालेले आहेत. ते सेवेत असताना म्हणजे जानेवारी २०११ मध्ये काही जणांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे आणि बनावट सह्या करून त्यांच्या नावाने राज्य परिवहन सहकरी बँकेतून कर्ज काढले. एकूण ९ लाख २० हजार ५०० रुपयांचे हे कर्ज त्यांच्या वेतनातून वसूलही करण्यात आले. या कर्जापोटी त्यांच्या वेतानातून ९ लाख ९१ हजार ५२७ रुपये वसूल करून घेतले तरी याचा कुणाला पत्ता लागलेला नव्हता. २०११ ते २०२० या दरम्यान १९ लाख १२ हजार ४७ रुपयांची आपली फसवणूक करण्यात आली असल्याचे अशोक पवार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.


राज्य परिवहन सहकारी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक बुचके (भोसरे, ता. माढा ), तत्कालीन उप लेखाकर व्ही एस जाधव (सांगली), तत्कालीन लिपिक यु व्ही मुचंडे, (सोलापूर), सफाई कामगार लक्ष्मण सोनवले (सांगोला) आणि एस टी कामगार सेनेचे सचिव गोरख कळकुंबे (सांगोला)  यांच्या विरुद्ध या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार उघडकीला आल्यानंतर राज्य परिवहन महामंडळातील इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या नावावरही असा काही प्रकार घडला असण्याची भीती त्यांना वाटू लागली आहे. गेल्या दहा अकरा वर्षात अनेक कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. किती कर्मचाऱ्यांच्या बनावट सह्या करून परस्पर कर्ज लाटले गेले आहे याची माहिती पोलीस तपासानंतर समोर येणार आहे. एक प्रकरण उघडकीस आल्याने अशाच प्रकारे आणखी काही कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज उचलण्यात येवून संबंधितांच्या वेतनातून  ते वसुलही करण्यात आले असण्याची शक्यता आहे.  


वाचा : सरपंचावर झाडली गोळी ! सोलापूर जिल्ह्यातील मोठी घटना !


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !