BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२२

खाकी वर्दी झाली कोरोनाने त्रस्त, न्यायालयातही घुसला कोरोना !

 



मुंबई : सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आपले आरोग्य संकटात घालणाऱ्या खाकी वर्दिलाच आता कोरोनाने त्रस्त केले असून न्यायालयातही कोरोनाने घुसखोरी केली आहे. शेकडो पोलीस कोरोना बाधित होत असून मुंबईत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 


कोरोनाचे आक्रमण आल्यापासून पोलीस आणि आरोग्य यंत्रणा यांच्यावर प्रचंड ताण पडत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तर प्रचंड विनाश झाला आहे. संचारबंदीच्या काळात पोलीस यंत्रणेने अविरत परिश्रम घेतलेले आहेत आणि आत पोलिसांच्या आरोग्याला मोठा धोकाही झाला आहे. सगळीकडेच कोरोना फोफावत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बाधित होत आहेत. जनतेच्या सुरक्षेची काळजी घेता घेता पोलिसांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. एकट्या नव्या मुंबईत गेल्या चार दिवसात १८० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ११२१० पोलीस कर्मचारी बाधित झाले आहेत. या १ हजार ३९० पोलिसातील ३० रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील दोन पोलीस कर्मचारी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचा जसजसा प्रभाव वाढीला लागला आहे तसतसे बाधीत पोलिसांच्या आकड्यातही वाढ होऊ लागली आहे. राज्यात आत्तापर्यंत ४६ हजारापेक्षा अधिक पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत तर ५०० पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. जवळपास ९ हजार पोलीस सद्या अलगीकरणात आहेत. ५५ वर्षे वयापुढील पोलिसांना 'वर्क फॉर्म होम' चा आदेश शासनाने काढल्याने थोडाफार दिलासा मिळाला असला तरी त्यांना घरी थांबवून कोणते काम द्यायचे हा पेच पोलिसांपुढे कायम आहे.


कोरोना आणि ओमीक्रॉन यांचा संसर्ग वेगाने पसरत असतानाच मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, संदीप कर्णिक, सत्यनारायण चौधरी, उपायुक्त डॉ. हरी बालाजी, गीता चव्हाण, सोमनाथ घार्गे, विशाल थकून, दत्ता नलावडे, प्रकाश जाधव, शिवाजी राठोड, नितीन पवार, सुनील भारद्वाज हे अधिकारी तर गृह विलगीकरणात आहेत. अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी देखील मोठ्या संख्येने बाधित होऊ लागले आहेत. मोटार परिवहन विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भाटी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर आर आर रेडकर या पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे  दल चिंतेत आहे.  मुंबई, ठाणे, पुणे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बाधित होत असल्याचे दिसून आले आहे. 


पोलीस रोज बाधित होत असताना सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाने घुसखोरी केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून चार न्यायाधीश देखील बाधित झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील ३२ न्यायाधीशांपैकी ४ न्यायाधीश कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे दोन आठवड्यांसाठी सर्व सुनावणी डिजिटल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस, न्यायालय आणि संसदेत देखील कोरोनाची बाधा होताना आढळून येत आहे. संसदेत काम करणारे ४०० कर्मचारी बाधित झाले आहेत. रोजचे आकडे हे भयावह स्थितीत पोहोचू लागले असून दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक पटीने तिसऱ्या लाटेतील प्रसार सुरु असल्याचे रोजचे आकडेच सांगू लागले आहेत. 

 

एका दिवसात ४४ हजार !

 ओमीक्रॉन रुग्णांची संख्याही आता वेगाने वाढू लागली आहे. काल एका दिवसात राज्यात ४४ हजार ३८८ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ओमीक्रॉनचे २०७ नवे रुग्ण आढळले आहेत. बारा रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा संख्या २ लाख २ हजार २५९ एवढी असून कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून राज्यातील १ लाख ४१ हजार ६३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ओमीक्रॉन रुग्णांची राज्यातील संख्या आता १ हजार २१६ वर पोहोचली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के असून मृत्युदर २.०४ टक्के आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत बाधित होण्याचा वेग अधिक आहे त्यामुळे बाधितांचे आकडे मोठ्या फरकाने रोज वाढताना दिसत आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !