BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२२

अपघात झाला आणि बाहेर आला वावीस लाखाचा गुटखा !




इंदापूर : कंटेनर आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि कंटेनरच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला म्हणून अपघातग्रस्त कंटेनर पोलीस ठाण्यात आणला आणि सहज पाहावे म्हणून पोलिसांनी पहिले तर तब्बल २२ लाखांचा  गुटखा  पोलिसांच्या समोर आला !


गुन्हेगाराने कितीही पाप झाकायचे प्रयत्न केला तरी ते आपोआप चव्हाट्यावर येते.  चोरी कधी ना कधी उघडी पडते म्हणतात तसेच झाले आणि शिकार आयतीच चालून शिकाऱ्याकडे आल्याचा हा प्रकार घडला. ९ जानेवारीच्या पहाटे सोलापूर - पुणे महामार्गावर इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'हॉटेल देशपांडे व्हेज' च्या समोर एक अपघात घडला. कर्नाटक पासिंग असलेल्या कंटेनरने ( केए ०१ ए एफ ३३९६) उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामुळे कंटेनरच्या पुढच्या बाजूचे प्रचंड नुकसान झाले. अपघाताचे वृत्त समजताच इंदापूर पोलीस धावून घटनास्थळी गेले आणि अपघातात जखमी झालेल्या चालकास उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. 


कंटेनरच्या पुढच्या भागाचा  चक्काचूर झाल्याने पोलिसांनी हा कंटेनर क्रेनच्या साहाय्याने ओढत आणून पोलीस ठाण्यात लावला. पोलिसांनी सहज कंटेनरची पाहणी केली. कंटेनर कोणता माल घेऊन जात होता हे पाहायला गेलेल्या पोलिसांना धक्काच बसला.  विक्री करण्यास आणि वाहतूक करण्यास बंदी असलेला २२ लाख रुपये किमतीचा, प्लॅस्टिकच्या  ४५ पोत्यात भरलेला गुटखा आढळून आला आणि पोलिसांचे डोळेच विस्फारले. एवढा बेकायदा गुटखा आरामात पुढे निघाला होता पण एका अपघाताने तो चालून पोलीस ठाण्यापर्यंत आला होता. आर. के. कंपनीचा हा गुटखा तब्बल २२ लाख रुपये किमतीचा असल्याचे आढळून आले.  हा गुटखा आणि २५ लाख रुपये किमतीचा सहा चाकी कंटेनर असा ४७ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 


इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुहास सिकंदर आरणे यांच्या फिर्यादीनुसार बेंगलोर येथील आरोपी हनीफ सय्यद आणि कंटेनर मालकाच्या विरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कित्येकदा अवैध माल शोधून पोलिसांच्या हाती लागत नाही पण एक अपघात घडला आणि हा बेकायदा गुटखा पोलीस ठाण्यापर्यंत सहीसलामत पोहोचला. सहज मालाची चौकशी करायला पोलीस गेले तर त्यांच्या हाती चक्क २२ लाखाचा बेकायदा गुटखा मिळाला. त्यामुळे इंदापूर परिसरात याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. 





   

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !