BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० जाने, २०२२

आ. गोपीचंद पडळकर होम ग्राउंडवरच 'क्लीन बोल्ड' !

 



खानापूर : राज्याच्या विविध भागात भाजपचा ढोल वाजविणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या 'होम ग्राउंड' वरच क्लीन ब्लोड झाले आहेत.  नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत मानहानीकारक  पराभव त्यांच्या वाट्याला आला आहे. 


भाजपचे प्रवक्ते आणि आमदार हे भारतीय जनता पक्षाचा ढोल वाजवताना सतत मोठी आणि वादग्रस्त विधाने करीत असतात. जनतेत त्याची चर्चाही होत असते. जनतेतून निवडून न येता त्यांना भाजपने आमदारकी दिली आहे आणि राष्ट्रवादीवर तोफ डागण्याचे काम ते इमाने इतबारे करीत देखील आहेत पण त्यांना त्यांच्याच खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत तोंडघशी पडावे लागले आहे. निवडणुकीत हार जीत असतेच त्यामुळे पराभव झाला म्हणजे फारच काही घडले असे नसते पण झालेला पराभवही तेवढ्या ताकदीचा असावा लागतो. आ. पडळकर यांनी खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आव्हानात्मक चित्र उभे केले पण ते केवळ पोकळ होते, केवळ बोलण्याने राजकारणात काहीच होत नाही हे दिसून आले. आ. गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी भाजपच्या वतीने १७ पैकी १६ जागांवर उमेदवार उभे केले आणि ही निवडणूक रंगतदार स्थितीत आणली होती. 


खानापूर नगरपंचायातीची निवडणूक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपसाठी तशी ही निवडणूक सोपी वाटणारी ठरली होती. ही निवडणूक जाहीर होताच भाजपच्या वतीने आपण संपूर्ण पॅनल उभे करू अशी घोषणा पडळकर बंधूनी केली होती आणि हे बोलताना प्रचंड आत्मविश्वास असल्याचे दाखवले होते. आ. गोपीचंद पडळकर यांचा व्यक्तिगत करिष्मा काही करेल असे वाटले होते पण त्यांचा काहीच करिष्मा नसल्यावर निवडणूक निकालाने शिक्कामोर्तब करून टाकले आहे. चमत्कार घडण्याच्या कल्पना काहींनी केल्या होत्या पण पडळकर यांच्यासह सगळ्यांच्याच भ्रमाचा भोपळा फुटला गेला. 


पडळकर बंधूनी पॅनल उभे करून शहराच्या प्रभागामध्ये बैठका घेत वातावरण निर्मिती तर चांगली केली होती. पण वास्तव आणि आभास यात मोठा फरक असतो. पडळकरांनी नेहमीपणानेच भाषणबाजीने हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खानापुरात आता अन्य राजकीय पक्षांना स्थान उरणारच नाही अशा पद्धतीची त्यांची भाषणबाजी लोकांनी ऐकलीही, शिवाय प्रचारासाठी भाजपचे बडे बडे नेते आणणार असल्याचे सांगत निवडणुकीत रंग भरण्याचा प्रयत्न देखील केला पण निवडणूक जवळ येताच उमेदवारांना त्यांनी वाऱ्यावर सोडले अशा प्रकराची चर्चा कार्यकर्त्यातच सुरु झाली. भाजप कार्यकर्तेही बरेच काही बोलू लागले असून निवडणुकीचा खेळ कसा मोडला हेच आता ते सांगू लागले आहेत.  


कुठलीही निवडणूक असली तरी विजय पराजय येथील काहीही वाट्याला येऊ शकते, पण या निवडणुकीने नेत्यांचे पितळ उघडे पाडायचे काम केले आणि त्याची झळ भाजपच्या प्रतिमेला बसली आहे. त्यांच्या सगळ्या उमेदवारांना मिळून केवळ १०५ मते मिळाली आहेत. ९ प्रभागात तर भाजप उमेदवाराला दुहेरी आकडा देखील मिळवता आला नाही तर दोन प्रभागात त्यांच्या उमेदवारांना दोन अंकी आकड्यापर्यंत कसे बसे पोहोचता आले. एवढा मानहानीकारक पराभव भाजप आणि आ, गोपीचंद पडळकर याना पत्करावा लागला आणि पडळकरांचा आपल्या गावातच काय करिष्मा आहे हे समोर आले. 


भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर राहतात त्या मतदारसंघात असलेल्या एकमेव नगर पंचायत निवडणुकीत भाजपाला भोपळा देखील फोडता आला नाही. राज्यभर भाषणे देत आणि मोठमोठया बाता मारणाऱ्या पडळकर याना आपल्याच होम ग्राउंडवर अत्यंत वाईट पद्धतीने क्लीन बोल्ड व्हावे लागल्याने महाराष्ट्रभर या निकालाची आणि नसलेल्या करिष्म्याची चर्चा सुरु झाली आहे.  या निकालातून आता तरी वास्तवाचे भान ठेवत काही बोध घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.  


वाचा :>> पंढरपूर, बार्शीत कोरोना सुसाट !          



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !