BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२२

पोलीसदादा करणार आता घरात बसून काम !

 



मुंबई  : रोज रस्त्यावर आणि पोलीस ठाण्यात बसून काम करणारे  पोलीसदादा यापुढे घरात बसूनच काम करणार आहेत. राज्य सरकारनेच तसा निर्णय घेतला आहे त्यामुळे काही पोलिसांना दिलासा मिळाला आहे. 


पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबत नेहमीच चांगले बोलले जात नाही, सगळेच पोलीस काही लाचखोर नसतात पण बरेचसे पोलीस चिरीमिरीसाठी सामान्य जनतेला छळत असतात म्हणून सगळ्यांचा बदनाम होण्याची वेळ येते हे देखील तितकेच सत्य आहे. पोलिसांची प्रतिमा फारशी चांगली नसली तरी कोरोनाच्या काळात याच पोलिसांनी प्रचंड त्याग केला आहे. लोकांनी घरात बसावे म्हणून दिवसरात्र आणि प्रसंगी उपाशी राहून पोलिसांनी रस्त्यावर दिवसरात्र काम केले आहे. आपल्या आरोग्याची परवा न करता पोलिसांनी घाम गाळला आहे हे सर्वानीच पहिले आहे. एवढेच नव्हे, या कामामुळे कित्येक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलीस आणि आरोग्य यंत्रणा गेल्या दोन वर्षात अत्यंत महत्वाच्या ठरल्या आहेत. आता पुन्हा कोरोना फोफावू लागला असून पोलिसांवरील ताण वाढत चाललेला आहे परंतु शासनाने त्यांचासाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवनवे निर्बंध लावणे सुरु झाले असून अजूनही ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. त्यातच काही दिवसांपासून कोरोनाबाधित होत असलेला रुग्णांत पोलिसांची संख्या वाढू लागली आहे. अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने ५५ वर्षावरील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना घरूनच काम करण्याचा (work from home)  निर्णय घेतला आहे. तसा आदेश गृह विभागाने काढून ५५ वर्षे वयाच्या पुढील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील असा निर्णय घेण्यात आला होता पण तो निर्णय घेण्यात काहीसा उशीर झाला होता. आता मात्र योग्य वेळी निर्णय घेतल्याने अनेक पोलिसांचे प्राण वाचणार आहेत. अहोरात्र जनतेसाठी राबणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने पोलीसातून राज्य शासनाला धन्यवाद दिले जात आहेत. नागरिकांनीही पोलिसांशी अकारण हुज्जत घालून त्यांना त्रास न देता त्यांना आपले कर्तव्य पार पाडण्यात सहकार्य करण्याची गरज आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !