मंगळवेढा : मरवडे येथील विषबाधा प्रकरणी पोलिसांना गुंगारा देत असलेले दोन आरोपींच्या मुक्सक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले असून या अटकेसाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. जनतेतून रोष होता आणि जनहित शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील एका कुटुंबाला दुध डेअरीतून आणलेले दुग्धजन्य पदार्ध भलतेच महागात पडले असून दोन चिमुकल्या बहिणींचा या विषबाधेत मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांच्या कुटुंबातील काही जणांना विषबाधा झाली होती. चव्हाण यांनी मंगळवेढा येथून श्री समर्थ डेअरी येथून श्रीखंड, बासुंदी, रबडी, पनीर असे पदार्थ घरी आणले होते. ते खाल्ल्यानंतर आबा चव्हाण, त्यांची पत्नी सुषमा चव्हाण, त्यांची सहा वर्षे वयाची मुलगी भक्ती आणि चार वर्षे वयाची मुलगी नम्रता, आबासाहेब चव्हाण यांचे वडील दगडू चव्हाण (वय ७०) उलट्या जुलाबाच त्रास होऊ लागला. मळमळ होऊन पोटात दुखू लागले त्यामुळे तातडीने ते मंगळवेढा आणि पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. दुर्दैवाने उपचार सुरु असताना भक्ती आणि नम्रता या दोन सख्ख्या बहिणींचा विषबाधेने मृत्यू झाला होता.
सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी मंगळवेढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवेढा येथल श्री समर्थ डेअरीचे संतोष लहू कोंडूभैरी आणि आकाश धोंडीराम फुगारे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर विषबाधा ही दुग्धजन्य पदार्थातून झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे त्यामुळे या विक्रेत्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ कलम व नियमन २०११ चे उल्लंघन झाले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाला परंतु आरोपींना अटक होत नव्हती. दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते.
जनतेत चर्चा आणि पोलिसांच्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त होत असताना पोलीस मात्र शांत होते त्यामुळे जनहित शेतकरी संघटना आज सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून रस्त्यावर उतरली आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मंगळवेढा पोलीस ठ्ण्याचे पोलीस निरीक्षक ज्यातीराम गुंजवटे यांनी अद्याप आरोपींना अटक कशी केली नाही ? असा सवाल उपस्थित करीत पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात करण्यात आली होती. आरोपीना लवकर अटक करण्याचे आश्वासन उप विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी दिले होते त्यानुसार आरोपीना अटक करण्यात आली आहे.
उप विभागीय अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, पोलीस नाईक दयानंद हेंबाडे, शिवाजी पांढरे, सुनील मोरे यांचे पथक निर्माण करण्यात आले होते. या पथकाने बातमीदारांमार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन आरोपींचा ठावठिकाणा लावला आणि त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे छापा टाकून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संतोष कुंडुभैरी आणि आकाश फुगारे या दोघांनाही अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपीना अटक केल्यामुळे पथकास धन्यवाद देण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !