BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२२

अकरा वेळा लस घेतलेल्या आजोबाना केली अटक !

 


पाटणा : कोरोना एवढा विनाशकारी असून असंख्य लोकांनी अजूनही लसीकारणाकडे पाठ फिरवली आहे तर दुसरीकडे एका आजोबाने ११ वेळा लस घेतली म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेंव्हा कोरोनावर काहीच उपाय नाही म्हणून चिंता व्यक्त केली जात होती . अभ्यासकांनी दिवसरात्र परिश्रम करून कोरोनाला प्रतिबंध करणारी लस शोधून काढली आणि शासनाने ती जनतेसाठी मोफत खुली केली. सुरुवातीच्या काळात लसीचा तुटवडा होता तेंव्हा लसीकरण केंद्रावर रांगा लागत होत्या आणि आता मुबलक लस उपलब्ध असताना असंख्य लोक लस घ्यायला तयार नाहीत. लसीबाबत अनेकांचे अनेक गैरसमज आहेत तसे अनेकांनी अनेक दावेही केलेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काही जणांच्या अन्य व्याधी देखील ठीक झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे ही लस सतत कुठल्यातरी कारणाने वेगळ्या चर्चेत राहिली आहे. असे असतानाच बिहारमधील एका ८४ वर्षाच्या वृद्धाने ११ वेळा ही लस घेतली आणि बाराव्या वेळी लस घेण्यास आले तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. 


लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी होते आणि अशा नोंदणीमुळे अधिकवेळा लस घेताच येत नाही पण या आजोबांनी शक्कल लढवली आणि प्रशासनालाही टोपी घालत तब्बल अकरा वेळा कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. मधेपुरा येथील ब्रह्मदेव मंडल या ८४ वर्षे वयाच्या आजोबांनी दहा महिन्याच्या कालावधीत ११ वेळा लस घेतली पण प्रशासनाला याचा थांगपत्ताही लागला नाही. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही लस घेतली आणि १२ व्या वेळी लस घेण्यासाठी गेले त्यावेळी लस संपली आणि त्यांनी अकरा वेळा लस घेतल्याचे भांडे फुटले. लसीचा तुटवडा असल्याने अनेकांना काही काळ वाट पहावी लागली तर अनेकजण केंद्रावरून रिकाम्या हाती परत जात होते. हे आजोबा मात्र तब्बल अकरा वेळा लस घेऊन रिकामे झाले होते. हा प्रकार उघडकीस आला तेंव्हा प्रशासनात एकाच खळबळ उडाली. 


आपण अकरा वेळा लस घेतली असल्याचे या आजोबांनी प्रामाणिकपणे सांगितले आहे. 'लस घेतल्याने आपणास खूप फायदा झाला असल्याने आपण पुन्हा पुन्हा लस घेत होतो, बाराव्या  वेळी लस घेण्यासाठी गेलो पण तेथील केंद्रावर लस देण्याचे बंद झाले होते त्यामुळे बाराव्या वेळी आपणास लस घेता आली नाही.'  असे ब्रह्मदेव मंडल यांनी सांगितले आहे. कुठल्या तारखेस आणि कुठल्या लसीकरण केंद्रावर लस घेतली त्याच्या नोंदीही त्यांनी करून ठेवल्या आहेत. मंडल हे अशिक्षित नसून केंद्र सरकारचे निवृत्त कर्मचारी आहेत. टपाल विभागात काम करून ते सेवानिवृत्त झाले आहेत. 


अकरा वेळा लस घेतल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेतच. त्यांची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई होणे आता अटळ  आहे परंतु ८४ वर्षे वयाच्या या आजोबावर काय कारवाई करायची हा विषय देखील चर्चेचा झाला होता पण अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. भारतीय दंड विधान कलम १८८,४१९, ४२० या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेली ही लस अमृतासारखी आहे. शासनाने ही खूप चांगली गोष्ट तयार केली आहे. काही लोक विनाकारण या लसीबाबत गैरसमज करून बसलेले आहेत. प्रत्येकाने ही लस घ्यावी असे आपण आवाहन करीत असल्याचेही या आजोबांनी सांगितले आहे. अकरा वेळा लस घेणाऱ्या आजोबाना अटक झाली असली तरी संपूर्ण बिहारमध्ये या आजोबांची चर्चा सुरु आहे आणि प्रशासनाला मात्र टोमणे मारले जात आहेत. लसीकरण प्रक्रिया वादात सापडली असून या यंत्रणेला मात्र मोठ्या प्रमाणात दोष दिला जात आहे. एकच व्यक्ती तब्बल अकरा वेळा लस घेतो तरी प्रशासनाला याचा पत्ता  लागत नाही यावरून प्रशासनावर  मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. 

  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !