लातूर : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी चोरट्यानी वेगळेच धाडस दाखवले असून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची किल्लारी शाखा फोडून बँकेतील बारा लाख रुपयावर डल्ला मारला आहे. या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
रस्त्यात लुटमार करणे, घराला कुलूप असल्याचे पाहून रात्री त्या घरात घुसून दागिने, रोकड पळवणे, एवढेच काय पण शस्त्राचा धाक लुटणे हे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. अलीकडे बँकेचे एटीम फोडण्याच्या घटनाही वाढीला लागल्या आहेत पण गेल्या काही दिवसात चोरटे थेट बँकेत घुसून दरोडा टाकणे, चोरी करून निघून जाणे असे गुन्हे बिनधास्त करू लागले आहेत. असाच प्रकार लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील जिल्हा मध्यवर्ती शाखेत घडल्याचे आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उघडकीस आले.
आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभर आनंदाने साजरा करण्यात आला. मोठ्या उत्साहात भल्या सकाळी तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. पण लोक घराच्या बाहेर येण्याआधीच अज्ञात चोरते बँकेत चोरी करून बँकेच्या बाहेर पडलेले होते. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या किल्लारी शाखेचे कर्मचारी आज भल्या सकाळी ध्वजारोहण समारंभासाठी बँकेत आले असता त्यांना धक्का बसला. बँकेचे शटर तोडल्याचे तसेच कुलूप, कडी कोयंडे तुटले असल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांना भल्या सकाळी पाहायला मिळाले.
बँकेचे शतर तोडून चोरट्यांनी मोठा गॅस सिलेंडर बँकेच्या आत नेला आणि दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शटरचे कुलूप तोडण्यात आले. गॅस वेल्डिंगच्या मदतीने लॉकर रूमच्या दवजाचेही काडी कोयंडा कापून चोरटे बँकेत घुसले आणि बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकले. बँकेतील तिजोरी कापून आतील बारा लाखाची रक्कम चोरटयांनी पळवून नेली. हा प्रकार निदर्शनास आल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. बँक फोडल्याची घटना ऐकून पोलिसांनाही हादरा बसला आणि त्यांनी बँकेकडे धाव घेतली. डॉग स्कॉडच्या मदतीने पोलिसांनी तपासाची दिशा मिळविण्याचा प्रयत्न केला. चोर दोन पेक्षा अधिक असावेत आणि त्यांनी वाहनाचा वापर केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पोलिसांनी आठच दिवसापूर्वी प्रत्येक बँकांना सावधगिरीची सूचना देऊन उपाय योजना करण्यास सांगितले होते. सीसीटीव्ही यंत्रणा, वाचमन अशी सगळी व्यवस्था करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या पण या घटनेत चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरेच काढून टाकले असल्याचे दिसले. या घटनेत बँकेचा हलगर्जीपणा दिसून येत आहे असेही पोलिसांचे मत झाले आहे. पहाटे २ वाजून २८ मिनिटांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या मोबाईलवर बँकेचा अलार्म वाजलेलाही आहे पण मोबाईल सायलेंटवर ठेवण्यात असल्याने आपणाला ते जाणवले नाही असे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले.
बँकेत घुसून चोरी झाल्याचे घटनेने किल्लारी परिसरच नव्हे तर सम्पूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने अन्य बँका आता अधिक सावध आणि सतर्क झाल्या आहेत. मध्यवर्ती बँक आधीच सतर्क राहिली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती. अलार्म वाजवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अलार्मची व्यवस्था मोबाईलवर असताना शाखाधिकारी रात्रीच्या वेळेस मोबाईल सायलेंट करून झोपत असतील तर त्या अलार्म व्यवस्थेचा उपयोग केवळ लोकांना सांगण्यासाठीच आहे की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाचा : झेंडा फडकवताना विजेचा प्रवाह, एक विद्यार्थी मृत्युमुखी तर --

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !