सोलापूर : एकीकडे पोलीस कोरोनाबाधित होत आहेत तर कोरोबाधित आरोपीवर उपचार करताना अटकेतील आरोपी पळून जाऊ लागल्याने पोलिसांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.
कोरोनाने खुलेआम शिरकाव केला आहेच पण कोठडीतील कैद्यानाही कोरोनाची बाधा होऊ लागले असल्याचे रोज समोर येत आहे. कैदी असला किंवा आरोपी असला तरी त्यांच्या आरोग्याची काळजी पोलिसांना घ्यावीच लागते . सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या १९ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुका पातळीवरील उप कारागृहातील अनेक कैदी कोरोना बाधित झाले आहेत. आरोपींना न्यायालयात नेण्याची तसेच त्याला रुग्णालयात नेण्याची जबाबदारी देखील पोलिसांची असते. पोलीस आणि कैदी, आरोपी यांचा नित्याचा संबंध असतो. शिवाय हेच पोलीस कर्मचारी समाजात देखील वावरत असतात त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढत असतो. कर्तव्य म्हणून पोलिसांना आपले आरोग्य डावावर लावून हे सगळे करावेच लागते त्यात सोलापुरात दुसराही आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या चिंतेत भर पडली आहे.
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपित १९ आरोपी कोरोना बाधित झाले आहेत. त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. यातील पहिला कोरोनाबाधित एक आरोपी पळून गेल्याने खळबळ उडाली असतानाच दुसरा आरोपीही पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात आणि केटरिंग महाविद्यालयाच्या सेंटरमध्ये या आरोपींना ठेवण्यात आलेले आहे. या दोन्ही ठिकाणावरून आरोपींनी पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्यात यश मिळवले आहे.
बीड जिल्ह्यातील मंगळूर येथील २९ वर्षे वयाचा आरोपी विजय कुंडलिक गायकवाड हा केटरिंग महाविद्यालयाच्या सेंटरमधून सकाळच्या वेळेस पळून गेला. सकाळच्या वेळेस शौचालयात तो गेला आणि बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे शंका आलेल्या पोलिसाने त्याला बाहेरून आवाज दिला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर शौचालयाचा दरवाजा तोडावा लागला. आतमध्ये कुणीच नव्हते आणि खिडकी मात्र उघडी होती त्यामळे तो खिडकीतून पळून गेल्याचे स्पष्ट झाले. संतोष कांबळे हा आरोपी देखील बेडीतून हात काढून पोलिसांची नजर चुकवून पळून गेला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना कोरोनाची बाधा होऊ लागली असून त्यांना उपचार आणि विलगीकरणात ठेवणे या दोन्हीh बाबी महत्वाच्या आहेत पण अशा ठिकाणी आरोपीचे रक्षण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था देखील नसते आणि आरोपी पळून गेला की संबधित पोलिसावर कारवाई अटळ असते. एकीकडे पोलीस कोरोनाबाधित होत असताना दुसरीकडे त्यांच्यावर कारवाईची वेळ येण्याची शक्यता असते. दोन्ही बाजूनी पोलीस अडचणीत येऊ लागला असून रस्त्यावर काम करताना त्यांना कोरोनाचा संसर्ग होतो हे तर आणखी वेगळेच ठरते. अनेक गुन्ह्यातील आरोपी अटक करताना पोलिसांनी परिश्रम घेतलेले असतात आणि अशा ठिकाणावरून ते सहजपणे निसटून जातात. अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !