BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जाने, २०२२

आणखी एक निर्बंध ,वाढत्या कोरोनामुळे निर्बंधाचे फास आवळू लागले !

 

पुन्हा वर्क फ्रॉम होम !





नवी दिल्ली : ओमीक्रॉन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने एकेक निर्बंध लागू लागले असतानाच आता सरकारी कार्यालयातील उपस्थितीतीवर मर्यादा आणण्यात आली असून पुन्हा वर्क 'फॉर्म होम' सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


कोरोना आणि ओमीक्रॉन व्हेरिएंटने आता शासन आणि प्रशासन यांची पुरती झोप उडवली असून सरकार हळूहळू का होईना पण एकेक निर्बंध लावू लागले आहे. कोरोनाचा वेग प्रचंड असल्याने केंद्र आणि राज्य शासन अत्यंत सतर्क आहे, पहिल्या आणि विशेषतः दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा सहन करावा लागल्याने कुठलाही धोका पत्करण्याची मूढमध्ये सरकार नाही. पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत सद्या कसलाही विषय नाही असे राज्याचे काही मंत्री सांगत असताना काही मंत्री मात्र लॉकडाऊनचे संकेत देत आहेत. रुग्णांची जर प्रचंड वाढ झाली आणि दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवण्याची वेळ आली तर शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. तोपर्यंत खबरदारीचे सगळे उपाय शासन पातळीवर होऊ लागले आहेत. केंद्र शासन सतत निर्बंध कडक करण्याबाबत राज्यांना सूचना देत आहे, त्यातच आता केंद्र सरकारने सरकारी कार्यालयातील उपस्थितीबाबत नव्याने निर्देश दिले आहेत. 


केंद्र सरकारने केंद्राच्या कर्मचाऱ्यासाठी नवी नियमावली जारी केली असून त्यात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची मर्यादाही घालून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केच असावी आणि उरलेल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' दिले जावे असे या नव्या नियमावलीत म्हटले आहे. केंद्र सरकारने आपल्या सर्व विभागांना हे निर्देश दिले आहेत.  अधिकारी आणि कर्मचारी यांची गर्दी कमी करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याच्याही सूचना सर्व विभागांना दिल्या गेल्या आहेत. शिवाय जे कर्मचारी, अधिकारी प्रतिबंधात्मक विभागात राहात असतील त्यांना कामासाठी कार्यालयात न बोलाविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावूच नका असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. गर्भवती असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीमधून सूट देण्यात आली आहे. सरकारच्या या नव्या नियमांमुळे भविष्यात निर्बंध आणखी कडक होऊन ते लॉकडाऊनपर्यंत जाण्याचे हे संकेत मिळू लागले आहेत. 


दरम्यान निर्बंधांच्या नियमावलीबाबत देशात सर्वत्र समानता असावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सद्यातरी लॉकडाऊन हा विषय नाही आणि माध्यमांनीही जनतेच्या मनात लॉकडाऊनची भीती निर्माण करू नये असे टोपे यांनी सांगितले आहे पण दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या आधीच महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने निघाल्याचे म्हटले आहे.


नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना सुसाट सुटला असून रोज आढळणाऱ्या रुग्णात भर पडताना दिसत आहे. आकड्यांचा हा आलेख चढत्या क्रमांकाने असून दररोज बाधीत रुग्णांचे आकडे वाढत आहेत. ओमीक्रॉन रुग्णांची संख्याही वाढती असून निर्बंध कडक करण्याबाबत केंद्र शासन सतत सूचना देत आहे. सरकारी कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती आणि वर्क फ्रॉम होम हे सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हळूहळू महाराष्ट्र सरकारलाही असे निर्णय घ्यावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत असून चोरपावलांनी का होईना पण निर्बंधाचे फास आवळताना दिसत आहेत. 


      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !