BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२२

माजी मुख्यमंत्र्यांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न !




 

नवी दिल्ली : 'जय श्रीराम' च्या घोषणा देत एकाने व्यासपीठावर येऊन उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. 


पंजाबमध्ये एका सभेस जाताना देशाचे पंतप्रधान यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे प्रकरण वादळी ठरत असतानाच आज रावत काशीपुर येथील सभेत धक्कादायक प्रकार घडला. जय श्रीरामच्या घोषणा देत एक व्यक्ती थेट व्यासपीठावर चढला आणि त्याने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असला तरी रावत यांच्या आजूबाजूला असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.


आजच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेचे बारा वाजल्याचेच समोर आले आहे. सुरा घेऊन घोषणा देत एखादी व्यक्ती व्यासपीठावरील माजी मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ पोहोचते पण सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ राहते याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.  कॉंग्रेस पक्षाचे माजी मुख्यमत्री हरीश रावत एका कार्यक्रमासाठी आलेले असताना जाहीर सभा संपताच अचानक हा सर्व प्रकार घडला. अचानकपणे एक व्यक्ती हातात चाकू घेऊन व्यासपीठावर पोहोचला त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. रावत यांच्यावर हल्ला होण्याआधीच जवळच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या व्यक्तीच्या हातातील चाकू काढून घेत त्याला पोलिसांच्या हवाली केले. 


माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे या कार्यक्रमात आपले भाषण करून खाली बसले आणि याच वेळी हा हल्लेखोर व्यासपीठावर आला. प्रारंभी त्याने माईकचा ताबा मिळवत 'जय श्रीराम' च्या घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला रोखत माईक बंद केला. यावेळी या व्यक्तीने जवळचा चाकू बाहेर काढला आणि 'जय श्रीराम म्हणा नाहीतर ठार मारीन' अशा धमक्या देत व्यासपीठावर प्रचंड गोंधळ घातला. यावेळी व्यासपीठावरील कार्यकर्ते आणि नेते यांनी त्याला पकडून प्रथम त्याच्याकडील चाकू काढून घेतला. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेची ही मोठी चूक असल्याचे आरोप यावेळी कॉंग्रेसने केले. एवढी मोठी घटना घडेपर्यंत सुरक्षा यंत्रणा स्वस्थ कशी ? असा सवालही उपस्थित करण्यात आला.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !