BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ डिसें, २०२१

सोलापूर जिल्ह्यात नवे कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध लागू !



पंढरपूर : राज्य शासनाने काल नव्या निर्बंधाची घोषणा केल्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी यांनी नवा आदेश काढला असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  


राज्य शासनाच्या वतीने कालच राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केल्याची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार राज्यात सर्वत्र ही जमावबंदी लागू असणार आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर निर्बंध असून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी असणार आहे. विवाह सोहळ्यासाठी बंदिस्त सभागृहात एकावेळी शंभर पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती असणार नाही तर खुल्या जागेत ही मर्यादा २५० पेक्षा अधिक असणार नाही किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापेक्षा जे कमी असेल तेवढेच लोक उपस्थित राहू शकणार आहेत.

  


अन्य राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठीही उपस्थितीची संख्या शंभरपेक्षा अधिक असणार नाही. विवाह सोहळ्यासाठी असलेले नियम या कार्यक्रमांनाही लागू असणार आहेत.  या शिवाय अन्य कार्यक्रमासाठी बंदिस्त जागेत ज्या ठिकाणी आसन क्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसेल तसेच ज्या ठिकाणी आसन क्षमता निश्चित नसेल अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. हे कार्यक्रम जर खुल्या जागे असतील तर आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असणार नाही. 


खेळांच्या संदर्भातील समारंभ तसेच क्रीडा स्पर्धा यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असणार नाही.  या सर्व प्रकारापेक्षा वेगळ्या कार्यक्रम अथवा एकत्रित येण्याच्या अन्य कार्यक्रमासाठी उपस्थितीची संख्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निश्चित करेल. यासाठी २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे पालन होईल हे पहिले जाणार आहे.  चित्रपटगृहे, जिम, उपहारगृहे, नाट्यगृहे अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीस परवानगी असणार असून या ठिकाणांना त्यांची असणारी संपूर्ण क्षमता आणि ५० टक्के क्षमतेची संख्या घोषित करावी लागणार आहे. या शिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तेथे निर्बंध लावता येणार असून हे निबंध लागू करण्याआधी जनतेला त्याची माहिती देणे आवश्यक असणार आहे. 





दरम्यान राज्यात ओमीक्रोन विषाणूचे रुग्ण वाढू लागले असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. रोज ही संख्या वाढत निघालेली असल्याने चिंतेचा विषय बनू लागला आहे. देशात ४१५ तर महाराष्ट्रात या रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. त्यामुळे सहाजिकच निर्बंध लागू लागले असून लॉकडाऊन सारखा निर्णय मात्र एवढ्यात तरी होणार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !