मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सिंधुदुर्गपासून मुंबईपर्यंत मजबूत फिल्डिंग लावली असून कुठल्याही क्षणी राणे यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वातावरण चांगलेच तापले असताना आता आमदार नितेश राणे यांना अटक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कणकवली पोलिसांनी राणे यांची दोन वेळा चौकशी केली आणि त्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. या अटकेनंतर शिवसेनेने परब यांच्यावरील हल्ल्याचे मुख्य सूत्रधार म्हणून नितेश राणे यांना अटक करण्याची जोरदार मागणी लावून धरली आहे. पोलिसांची हालचाल पाहता नितेश राणे यांचावर अटकेची टांगती तलवर लटकत आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांना या हल्ल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी तिसऱ्यांदा सिंधुदुर्ग पोलिसांनी बोलावले होते पण राणे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे राणे यांच्या घरीही पोलिसांनी धडक मारली परंतु राणे घरीही आढळले नाहीत. आता पोलिसांनी सिंधुदुर्गपासून गोवा आणि मुंबईपर्यंत जोरदार फिल्डिंग लावली आहे. नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानाने दिल्लीला जाण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क करून तेथेही ही फिल्डिंग लावल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलिसांची मदत घेवून नितेश राणे यांना ताब्यात घेतले जाऊ शकते अशीही माहिती मिळत आहे. केंद्रीय मात्री नारायण राणे यांना अलीकडेच अटक करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ नितेश राणे यानाही अटक होणार काय ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सद्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असून अधिवेशन काळात आमदारांना अटक करता येत नाही. विशेष प्रकरणी अटक करायची झाल्यास त्यासाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते परंतु अद्याप अध्यक्षांची निवड होऊ शकलेली नाही. ही निवड आज होणार असून त्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन ही अटक होणार काय ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तथापि आज ही निवडणूक होणार की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. ही निवडणूक लांबण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यात आपणास अडकविण्याचा डाव सुरु आहे, या प्रकरणात आपल्याला गोवण्याचा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून विरोधी पक्षातील नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने केस टाकल्या जात आहेत तसाच अनुभव आपणास येत आहे असे आ. नितेश राणे यांनी म्हटले आहे.
अधिवेशनाच्या काळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून त्यांना चिडविण्याचा राणे यांनी केलेला प्रयत्न हास्यास्पद ठरला असून केवळ राजकीयच नव्हे तर समाजाच्या सर्व घटकातून टीका होत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणे यांना सुनावले आहे. राणे यांनी आपलेच हसे करून घेतले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेनेत मात्र या प्रकाराबाबत प्रचंड संताप आहे. या संतापाचं आगीतच परब हल्ला प्रकरणाच्या चौकशीने वेग घेतला आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष राणे यांच्यावर होऊ घातलेल्या कारवाईकडे लक्ष ठेऊन आहेत.
क्लिक करा : >> पंढरपूर पोलिसांचा आता 'यांच्या' वर डोळा !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !