पुणे : खून प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असून यात पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश जखमी झाले आहेत. आरोपी आणि पोलीस यांच्या अर्धा तास गोळीबार सुरु होता.
पिंपरी चिंचवड येथे योगेश जगताप या तरुणावर दिवसाढवळ्या दहा गोळ्या झाडून खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेने पिंपरी परिसरात खळबळ उडाली होती तर पोलीसही हादरून गेले होते. सदर खून प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती परंतु गणेश मोते आणि अश्विन चव्हाण हे दोन मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. पोलिसांची वेगवेगळी पथके या आरोपींचा शोध घेत होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हे आरोपी चाकण परिसरातील कोये येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, हरीश माने हे आरोपींना पकडण्यासाठी तेथे पोहोचले.
पोलिसांना खून प्रकरणात हवे असलेले आरोपी कोये परिसरात एका टेकडीवर लपून बसलेले होते. या आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला पोलिसांनीही गोळीबारानेच उत्तर देणे सुरु केले. दोन्ही बाजूनी हा गोळीबार सुरु होता आणि ही चकमक जवळपास अर्धा तास सुरूच राहिली. अखेर आरोपीकडून होणारा गोळीबार थांबला. आरोपीकडे दोन पिस्तुल होती आणि दोन्ही पिस्तुलातील गोळा संपल्या होत्या त्यामुळे आरोपींना काहीही करता येत नव्हते. पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि लपून बसलेल्या तीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गणेश मोते, अश्विन चव्हाण आणि महेश माने या तीनही हव्या असलेल्या आरोपींना जागेवरच पोलिसांनी जेरबंद केले. या गोळीबारात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाले आहेत.
हे वाचा : क्लिक करा :>> पंढरपूर पोलिसांचा आता 'यांच्या' वर डोळा !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !