BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ डिसें, २०२१

पंढरपूर पोलिसांचा आता 'यांच्या'वर डोळा !

 





पंढरपूर : दुचाकी असो अथवा चारचाकी, शहरात वाहन वेडेवाकडे चालताना दिसले की पोलीस त्यांना अडवून तपासणी करू लागले आहेत.  मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळला की थेट गुन्हा दाखल करून हिसका दाखवू लागले आहेत. 

पंढरपूर शहरात वाहतुकीला आधीपासूनच शिस्त नाही त्यात तळीराम मंडळी शहरातील रस्त्यावरून बिनधास्तपणे आणि बेफिकीरीने वाहने चालवत असतात. त्यांना कुणी रोखत नाही त्यामुळे गर्दीच्या रस्त्यावरही त्यांच्या वाहनांचा वेग कमी होत नाही की नागमोडी वळणं कमी होत नाहीत. त्यात ३१ डिसेंबर जवळ आलेला असल्याने पादचाऱ्याला अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. अशातःच पोलिसांचा डोळा मात्र आता या मंडळीकडे स्थिर झाल्याचे दिसत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविले की त्याला दंड नव्हे तर थेट गुन्हा दाखल करून वेगळाच हिसका दाखवला जात आहे. दोन दुचाकीस्वाराला असा इंगा दाखविल्यानंतर आता पुन्हा एका स्कॉर्पिओ चालकास असाच हिसका दाखवला आहे. त्यामुळे आता तळीराम मंडळीनी सावध होण्याची वेळ आली आहे. 

पंढरीतील चौफाळा परिसर म्हणजे सतत गजबजलेला आणि वाहनांची गर्दी होणारा शहराचा महत्वाचा भाग आहे. सायंकाळच्या वेळेस येथून वाहन घेऊन जाणे हे एक जिकिरीचे काम असते. नागरिक आणि वाहनांची मोठी गर्दी स्टेशन रोड आणि चौफाळा परिसरात असते. अशा गजबणाऱ्या चौफाळ्यातून एक स्कार्पिओचालक (एक एच ०९ / ए एल ६०३१) आपले वाहन वेडेवाकडे चालवत निघालेला पोलिसांच्या नजरेस पडला. चालकाच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीवरून पोलिसांनी बरोबर हेरले आणि त्याला रोखले, खरसोळी येथील २३ वर्षाचा तरुण दत्ता शहाजी सरफळे हा स्कार्पिओ वेडीवाकडी चालवत निघाला होता. 

स्कार्पिओचालक दत्ता सरफळे हा वेडीवाकडी गाडी चालवत असल्याने त्याने मद्यप्राशन केल्याची पोलिसांना आलेली शंका बरोबर निघाली. पोलिसांनी त्याला रोखले आणि त्याची चौकशी करीत असताना त्याच्या तोंडाला घाण आंबट वास येऊ लागला. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्याचे निमंत्रण दिले आणि आपल्या सोबत त्याला पोलीस ठाण्यात घेऊन आले. ब्रेथ ऍनालायझर मशीनच्या साहाय्याने त्याची तपासणी केली. या तपासणीत चालकाने मद्यार्काचे सेवन केल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेच सरफळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

 
दुचाकीस्वरावर गुन्हे !
परवाच मद्यप्राशन करून दुचाकी चालवत असलेल्या दोघावर पंढरपूर पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला होता. जगदंबा नगर, पंढरपूर येथे राहणारा तुषार सुर्यकांत खेंडकर आणि पद्मावती गार्डन येथे राहणारा रामा भास्कर पवार या दोघांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ रात्रीच्या साडे सात वाजण्याच्या सुमारास रामा पवार हा वेडीवाकडी दुचाकी चालवताना पोलिसांना आढळून आला. एम एच १३ डी सी ९६८९ या क्रमांकाची दुचाकी घेऊन ती वेडीवाकडी चालवत होता. 


नागरिकांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर वेडीवाकडी दुचाकी चालवताना दिसल्याने पोलिसांनी त्याला हटकले आणि चौकशी केली. यावेळी त्याच्या तोंडाला आंबट, उग्र वास येऊ लागल्याने त्याने मद्यप्राशन केल्याची जाणीव पोलिसांना झाली. त्याला पोलीस ठाण्यात नेऊन मशीनच्या सहाय्याने तपासणी केली असता त्याने मद्यार्काचे सेवन केल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी रामा पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जगदंबा नगर येथे राहणारा तुषार खेंडकर हा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर अशाच प्रकारे आढळून आला.  दुचाकी (एम एच १३ सी सी ७३५३) वेडीवाकडी चालवत निघालेल्या खेंडकर यास पोलिसांनी रोखले आणि चौकशी केली. यावेळी हा देखील मद्यप्राशन करून दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचीही तपासणी केली असता मद्यार्काचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या विरोधातही पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

३१ डिसेंबर जवळ येत असतानाच पोलिसांनी आपली नजर या तळीरामाकडे वळवली असून थेट गुन्हाच दाखल केला जात असल्याने याची चर्चा शहरभर होत असून अनेकांनी या कारवाईचा धसका घेतला आहे तर सामान्य नागरिक पोलिसांना धन्यवाद देताना दिसत आहेत. अशा कारवाईचा धडाका लावल्यास शहरातील रस्त्यावर तरी ही मंडळी दिसणार नाहीत अशी नागरिकांना खात्री वाटू लागली आहे. ३१ डिसेंबरच्या आधीच पोलिसांनी आपला मोर्चा या मंडळीकडे वळवला असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !