सोलापूर : 'पक्ष सोडून गेलेल्यांना पाहून घेतो' असा इशाराच माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुशीलकुमार यांनी आज दिल्याने राजकीय वर्तुळात एक नवी चर्चा सुरु झाली आहे.
सोलापूर काँग्रेस भवनात आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी आपला इरादाच स्पष्ट केला आहे. सोलापूर शहरात अनेक सामान्य कार्यकर्त्यांना सुशीलकुमार शिंदे यांनी ताकद दिली पण तेच नेते पुढे सोयीनुसार काँग्रेस पक्ष आणि सुशीलकुमार शिंदे यांना सोडून गेले. ही सल शिंदे यांच्या मनात बोचत असल्याचेही आज त्यांच्या विधानावरून दिसून आले. "शहर काँग्रेसचे अध्यक्ष असणारे सुधीर खरटमल यांनी आत्तापर्यंत दोनदा पक्ष सोडला आहे. जायचे त्यांना जाऊ द्या, काँग्रेस पक्ष पुन्हा निश्चितपणे उभा राहील, सोडून गेलेल्यांना पाहून घेतो " असे विधान करून त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना एक प्रकारे सणसणीत इशाराच दिला आहे. आपण आता रिटायर झालो असून आमदार प्रणिती शिंदे याच आता नेत्या आहेत असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.
राजकारणात वेगवेगळे पक्ष असले तरी देश आणि राज्याच्या प्रगतीसाठी सगळ्याच पक्षातील नेत्यांचे परस्परांशी संबंध चांगलेच असायला हवेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याशी आपले संबंध कायम चांगलेच होते. काँग्रेस पक्ष सद्या अडचणीतून जात आहे, देशात काँग्रेस पक्ष तीन वेळा वाईट काळातून गेला तरीही तो खंबीर राहिला आणि आपल्या विचारधारेवर तो नव्या जोमाने पुन्हा उभा राहिला आहे. जाती धर्माऐवजी पक्षाने सर्वधर्मसमभाव जपला आहे, मागील लोकसभा निवडणुकीत जाती धर्माच्या नावावर मते मागणाऱ्यांचा विजय झाला पण काँग्रेस पक्ष पुन्हा ताठ मानेने उभा राहील असा आशावाद त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कॉम्प्रमाईज आवश्यक
राजकारणात कॉम्प्रमाईज करण्याच्या वेळा येत असतात, सद्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, ही महाआघाडी टिकविण्यासाठी जेथे ज्या पक्षाची शक्ती मोठी आहे तेथे हे कॉम्प्रमाईज करावेच लागणार आहे, स्वतंत्रपणे लढून विरोधकांना संधी देण्यापेक्षा तिघांनी मिळून एकत्रित वाढल्यास निश्चित फायदाच होणार आहे असेही यावेळी बोलताना कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
कुणी म्हणाले म्हणून --
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा राष्ट्रपती राजवटीबाबत भाष्य केले आहे. पाटील यांच्या विधानाची राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी तर जोरदार खिल्ली उडवली आहे तर सुशीलकुमार शिंदे यांनीही टोला लगावला आहे. कुणी एका पक्षाचा अध्यक्ष म्हणतो म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होत नसते, त्यासाठी काही निकष असतात आणि राज्यात तशी परिस्थिती निर्माण व्हावी लागते तेंव्हाच राष्ट्रपती राजवट लागू होत असते असे सांगत चंद्रकांत पाटील यांची खिल्ली शिंदे यांनी उडवली.
दखल कोण घेतो ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी तर आज सातारा येथे बोलताना चंद्रकांत पाटील याना 'किरकोळ' मध्ये काढले. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ' राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्पष्ट बहुमत आहे, राज्य सरकार स्थिर ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधाने करीत असतात. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची विधाने केली आहेत, त्याची नोंद राज्यातील सामान्य जनता घेत नाही, त्याचा काही फायदाही होत नाही म्हणून त्यावर अधिक भाष्य करण्यास मी इच्छुक नाही. त्यांना नवीन वर्षात माझ्या शुभेच्छा आहेत !"
वाचा : >> खुनातील आरोपींचा पोलिसावर गोळीबार !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !