BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ नोव्हें, २०२१

सरपंच गेला पळून, ग्रामपंचायत सदस्य अडकला जाळ्यात !

 



वडगाव मावळ :  दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वेगळाच फटाका फुटला असून भ्रष्ट सरपंच गावातून पळून गेला तर ग्रामपंचायत सदस्य मात्र जाळ्यात अडकला आणि पुणे जिल्हाभर या सरपंच महोदयांची चर्चा सुरु झाली !

सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि अनकेदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकून पडतात. अनके अधिकारी आपला भ्रष्टाचार पचवतात आणि ढेकरही देत नाहीत.  सरकारी अधिकारी कर्मचारी यांचा भ्रष्ट्राचार नेहमीच उघडा पडतो पण लोक प्रतिनिधींनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत नेहमी केवळ चर्चाच होत राहते. राजकारातील भ्रष्टाचार दिल्ली ते गल्ली चालत असतो असं म्हटलं जातं पण ते किती खरं आहे हेच आज पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे दिसून आलं !  साते ग्राम पंचायतीच्या एका सदस्याला पकडण्यात आलं आणि  सरपंच महोदय मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. 

गावपातळीवरील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच गावकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणून निवडून येतात. निवडून आल्यानंतर ते गावाची कशी सेवा करतात हे आता सर्व सामान्य जनतेलाही चांगले माहित झालेले आहे. मावळातील साते ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि सदस्याला आता गावात तोंड दाखवायची पंचाईत झाली आहे. दीड लाख रुपयाच्या लाच प्रकरणी त्यांना चांगलाच हिसका बसला आहे.  

भंगार दुकानाच्या संदर्भात नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्राम पंचायत सरपंच आणि सदस्य यांनी तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. भंगार शेडबाबत गावकऱ्यांनी तक्रारी अर्ज दिला होता. त्यामुळे हे दुकान सुरु ठेवण्यासाठी सरपंच संतोष शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ आगळमे यांनी दुकानदारास तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोड करून एक लाख रुपयावर सौदा पक्का झाला.  लाच देण्याचे मान्य करून दुकानदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि तक्रार दिली. सदर तक्रार प्राप्त होताच या विभागाने पडताळणी केली आणि लाचखोराना पकडण्यासाठी सापळा रचला.    

ठरल्याप्रमाणे कान्हे फाटा येथील शिवराज हॉटेलच्या मागील बाजूस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दबा धरून बसले. एक लाखाची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत सदस्य आयतेच जाळ्यात अडकले पण याची कुणकुण लागताच प्रसंग बाका असल्याचे पाहून सरपंच महोदयांनी पळ काढला. सदस्याला मात्र काहीच हालचाल करता आली नाही. सरपंच महोदय पळून पळून जाणार तरी कुठे ? पण अधिकाऱ्यांच्या तावडीतून तरी निसटले असून वडगाव मावळ पोलिसांत दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायत सदस्याला अटक करण्यात आली असून आता पोलीस सरपंचाच्या शोधात आहेत. एक चार चाकी गाडीही या कारवाईत जप्त करण्यात आली आहे. ज्या गावात सरपंच म्हणून रुबाब करायला मिळाला त्याच गावातून पळून जाण्याची वेळ तर आलीच पण आता हे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य महाशय कुठल्या तोंडाने गावकऱ्यांसमोर जाणार आणि गावाला शहाणपणा शिकवणार ? लाच प्रकरणाची आणि सरपंच पळून गेल्याची चर्चा मात्र सद्यातरी पुणे जिल्हाभर सुरु झाली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !