BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑक्टो, २०२१

पंढरपूर - करकंब रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू !


 उसाच्या ट्रॉलीला धडक 
शिक्षकाचा जागीच मृत्यू 


पंढरपूर : उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पंढरपूर-करकंब मार्गावर काल रात्री घडली असून ऊंस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी गेला आहे. 

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले की बेफिकीरपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अतिरेक सुरु होतो आणि निरपराध नागरिकांचे प्राण जातात हे नित्याचेच झाले आहे. कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवत आणि एक ट्रॅक्टरला अनेक ट्रॉली जोडून, ऊस भरून हे ट्रॅक्टर धावत असतात. रात्री कुठेही उभे केलेल्या या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागे रिफ्लेक्टरही नसते त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना रस्त्यात थांबलेले हे जीवघेणे ट्रॅक्टर दिसत नाहीत आणि यातच अपघात होत राहतात. असाच एक अपघात रात्री गुरसाळे गावाजवळ झाला आहे. 

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर गुरसाळे गावाजवळ रस्त्यावर थांबलेला होता, रात्रीच्या वेळेस पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला ट्रॅक्टर आणि उसाने भरलेली ट्रॉली नजरेस पडली नाही त्यामुळे दुचाकी (एम एच १३ बी एच १५७१)   थेट जाऊन ट्रॉलीला धडकली आणि  दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. खर्डी येथे झालेल्या अपघातापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी गुरसाळे येथे हा अपघात झाला आहे . काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात पंढरपूर येथील सोमनाथ खाडे यांचा मृत्यू झाला असून खाडे हे शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर काही काळ येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

उस वाहतूक करणारे ट्रक्टर हे सतत धोक्याचे ठरत आहेत. रस्त्यावरून जाताना अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जातात त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाची त्याला माहितीही होत नाही आणि ती माहिती करून घेणे चालकाला आवश्यक वाटत नाही. एका ट्रॅक्टरला अनेक ट्रॉली लावल्या जातात आणि क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून अंत्यंत वेड्यावाकड्या आणि बेफिकीर पद्धतीने ट्रॅक्टर चालवले जातात. यामुळे नागरिकांच्या प्राणावर सतत मृत्यूची टांगती तलवार असते. साधे रिफ्लेक्टरही लावलेले नसतात आणि ही वाहने रस्त्यात कुठेही, कशीही उभी केली जातात . रात्रीच्या वेळी ही वाहने दिसत नसल्याने मागून येणारे वाहन सरळ या उभ्या वाहनांना धडकतात आणि अपघात होतात.  

भर रस्त्यावरून असे ट्रॅक्टर बिनधास्त धावत सुटतात. जड वाहनांना मनाई असलेल्या रस्त्यावरूनही ही वाहने धावत असतात. वाहतुकीच्या सगळ्या नियमन फाटा दिला जातो पण वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असतात. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला तर या वाहतुकीला शिस्त लागू शकते आणि नागरिकांचे प्राण वाचू शकतात. वाहतूक पोलीस मात्र या वाहतुकीशी आपला काहीच संबंध नाही अशा रितीने या वाहतुकीकडे पाहत असतात. वरिष्ठ पातळीवरूनच या बाबीची दखल घेणे आवश्यक असून तर आणि तरच अपघाताचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचे जीव वाचण्याची शक्यता आहे. अशा वाहनांमुळे होणारे अपघात आणि मृत्यूंची संख्या तुलनेने अधिक आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !